भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू अर्शदीप सिंग सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाबकडून दमदार गोलंदाजी करताना अर्शदीपने बलाढ्य मुंबईची हवाच काढली. पंजाबकडून अर्शदीप सिंगने ५ विकेट घेतल्या. त्याने १० षटके टाकली, ज्यात केवळ ३८ धावा खर्च केल्या.
अर्शदीप सिंगच्या घातक गोलंदाजीमुळे मुंबईच्या तगड्या फलंदाजांची अवस्था केविलवाणी झाली.
अर्शदीपने कर्णधार श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, अंगकृष्ण रघुवंशी आणि आयुष म्हात्रे यांची विकेट घेतली. मुंबईचे हे ५ फलंदाज आपल्या स्फोटक फलंदाजीने कोणत्याही गोलंदाजाची अवस्था खराब शकतात, पण अर्शदीपसमोर या फलंदाजांना काहीच करता आले नाही.
अर्शदीप सिंगने पहिल्या षटकापासूनच धुमाकूळ घातला. यामुळे मुंबईचे सुरुवातीचे तगडे फलंदाज अवघ्या २८ धावांत तंबूत परतले होते. मुंबईच्या टॉप-५ पैकी ४ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. टॉप-५ मध्ये फक्त कर्णधार श्रेयस अय्यरने १७ धावांचे योगदान दिले.
मिस्टर ३६० डिग्री सूर्यकुमार यादव तर शुन्यावर बाद झाला. यानंतर शेवटी अथर्व अंकोलेकर याने खालच्या फळीत मुंबईसाठी दमदार फलंदाजी करत ६६ धावांची खेळी केली. मुंबईकडून अथर्वशिवाय सूर्यांश शेडगेने ४४ आणि शार्दुल ठाकूरने ४३ धावा केल्या. खालच्या फळीतील या फलंदाजांच्या चमकदार खेळामुळेच मुंबईचा संघ ४८.५ षटकात २४८ धावांपर्यंत पोहोचू शकला.
मुंबईला २४८ धावांवर रोखल्यानंतर पंजाबने सहज सामना जिंकला. त्यांच्याकडून प्रभसिमरन सिंग याने वादळी शतक केले. त्याने १०१ चेंडूत १५० धावा केल्या. या खेळीत १० षटकार आणि १४ चौकार मारले. तर दुसरा सलामीवीर आणि कर्णधार अभिषेक शर्माने ५४ चेंडूत ६६ धावा केल्या. पंजाबने २९ षटकात २ बाद २४९ धावा करत सामना जिंकला.