आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाची तारीख अद्याप समोर आलेली नाही, परंतु त्याबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. या मेगा लिलावापूर्वी सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आपल्या धारदार गोलंदाजीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे.
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) निमंत्रित स्पर्धेत गोव्याकडून खेळताना अर्जुन तेंडुलकरने एकाच सामन्यात ९ बळी घेत खळबळ उडवून दिली. या कामगिरीनंतर त्याच्यावर लिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता वाढली आहे.
देशांतर्गत सर्किटमध्ये कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात अर्जुनच्या ९ विकेट्समुळे गोव्याने कर्नाटकचा एक डाव आणि १८९ धावांनी मोठा पराभव केला आहे. त्याने पहिल्या डावात ४१ धावांत ५ तर दुसऱ्या डावात ४६ धावांत ४ बळी घेतले.
त्याने संपूर्ण सामन्यात ८७ धावा देत ९ विकेट घेतल्या. बीसीसीआयच्या रिटेन्शन पॉलिसीबाबत अजूनही सस्पेंस कायम आहे, पण मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला रीलीज करेल अशी शक्यता आहे. जर तो लिलावात उतरला तर त्याला नक्कीच मोठी बोली लागू शकते.
आयपीएल २०२४ मुंबई इंडियन्ससाठी अजिबात चांगले नव्हते आणि यावेळी मेगा लिलावानंतर, अर्ध्याहून अधिक MI चा संघ बदललेला दिसण्याची अपेक्षा आहे. एमआय अर्जुनला लिलावापूर्वी सोडू शकते असे दावे केले जात आहेत परंतु त्याचा सध्याचा फॉर्म पाहता मुंबई त्याला पुन्हा समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू शकते.
अर्जुनने २०२३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये त्याने ५ सामन्यात ३ विकेट घेतल्या. पण त्याच्या ९.३७ च्या खराब इकॉनॉमी रेटबद्दल त्याच्यावर जोरदार टीका झाली. पण जर अर्जुन लिलावात उतरला, तर त्याच्यावर मोठ्या बोली लागू शकते. कारण तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे आणि चेंडू स्विंगही करतो.