टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली गेल्या काही काळापासून सारख्याच पद्धतीने बाद होत आहे. विराट ऑफ स्टंपबाहेरील चेंडूंवर बाद होत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील चौथी कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला ३४० धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि केएल राहुल अनुक्रमे ९ आणि ० धावांवर बाद झाले. अशा परिस्थितीत कोहली आपली जुनी चूक पुन्हा करणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही, कारण तो पुन्हा त्याच पद्धतीने बाद झाला. मिचेल स्टार्कची चाल त्याला महागात पडली. कोहली बाद झाल्यानंतर त्याची पत्नी अनुष्का शर्माची प्रतिक्रियाही व्हायरल होत आहे.
विराट कोहली अशा वेळी फलंदाजीला आला होता, जेव्हा भारतीय संघाने अवघ्या २५ धावांवर २ विकेट गमावल्या होत्या. ३४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताने उपाहारापर्यंत आपला डाव अतिशय संथ गतीने पुढे नेला. भारताने २६ षटकांच्या खेळात केवळ ३३ धावा केल्या होत्या. खरे तर कोहलीची विकेट पडल्यानंतरच मैदानावरील पंचांनी लंचची घोषणा केली. कोहलीने केवळ ५ धावा करून बाद झाल्यानंतर कॅमेरा अनुष्का शर्माकडे वळला तेव्हा ती खूपच निराश दिसली.
अनुष्का आधी टाळ्या वाजवताना दिसली होती पण कोहलीची विकेट पडताच तिच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती. 'किंग कोहली'ला बाद केल्याने केवळ अनुष्काच नाही तर मैदानात उपस्थित असलेले तमाम भारतीय चाहते निराश झाले होते.
ऑफ स्टंपबाहेरचे चेंडू विराट कोहलीसाठी अडचणीचे ठरले आहेत. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात विराट ऑफ स्टंपबाहेरील चेंडूला हातही लावणार नाही, अशी शपथ घेऊन आला होता. त्याने असे बरेच चेंडू सोडून दिले.
पण यशस्वी जैस्वाल धावबाद होताच त्याचे लक्ष विचलीत झाले. यामुळे बाहेरील चेंडूला खेळण्याच्या प्रयत्नात तो आऊट झाला. आता दुसऱ्या डावातही मिचेल स्टार्कने त्याला ऑफ स्टंपबाहेरचा चेंडू खेळण्यास भाग पाडले.
संबंधित बातम्या