रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या सहाव्या फेरीला गुरुवारपासून (२३ जानेवारी) सुरुवात झाली. या स्पर्धेत टीम इंडियाचे सीनियर खेळाडू आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा सीनियर खेळाडूंवर खिळल्या होत्या. तसेच, या स्पर्धेत काही खेळाडूंना पदार्पणाचीही संधी मिळाली.
एलिट गट-सी मध्ये बंगालचा सामना हरियाणाशी सुरू आहे. या सामन्यात १५ वर्षे ३६१ दिवसांचा खेळाडू अंकित चॅटर्जी याने बंगालकडून रणजी पदार्पण केले.
बंगालसाठी पदार्पण करताच अंकितने टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली याचा मोठा विक्रम मोडला.
अंकित चॅटर्जी सध्या दहावीत आहे. तो बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. सौरव गांगुलीने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी १९८९-९० च्या रणजी ट्रॉफी फायनलमध्ये दिल्ली विरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
या सामन्यात बंगालच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बंगालच्या गोलंदाजांनी हरियाणा संघाला पहिल्या डावात १५७ धावांत गुंडाळले. अंकित हा डावखुरा फलंदाज असून उजव्या हाताचा ऑफस्पिन गोलंदाजही आहे. बंगालसाठी सूरज जैस्वालने घातक गोलंदाजी केली.
हरियाणाचा कर्णधार अंकित कुमारने ५७ धावांची खेळी केली. याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर जास्त वेळ घालवता आला नाही. बंगालसाठी सूरज जैस्वालची जादू पाहायला मिळाली. सूरजने १२.५ षटकात ४६ धावा देत ६ बळी घेतले.
याशिवाय मुकेश कुमार आणि मोहम्मद कैफ यांनीही प्रत्येकी २ बळी घेण्यात यश मिळवले. बंगालचा संघ सध्या १४ गुणांसह एलिट गट-सी मध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
दुसरीकडे प्रदीर्घ कालावधीनंतर रणजी स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या संघातील वरिष्ठ खेळाडूंची कामगिरी निराशाजनक ठरली. मुंबईकडून खेळायला आले तेव्हा रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. दिल्लीकडून खेळणारा पंतही फ्लॉप ठरला. त्याचवेळी शुभमन गिलने पंजाबच्या चाहत्यांची निराशा केली. तर रवींद्र जडेजाने सौराष्ट्रासाठी ५ विकेट घेत अष्टपैलू कामगिरी केली.
संबंधित बातम्या