ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (AUS vs WI 3rd T20I) यांच्यातील तिसरा टी-20 सामना आज (१३ फेब्रुवारी) पर्थ येथे खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेल आणि शेरफेन रदरफोर्ड यांनी धुमाकूळ घातला. या दोघांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलिायचा ३७ धावांनी पराभव केला.
वेस्ट इंडिजने हा सामना जिंकला पण ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी घातली.
या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद २२० धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला २० षटकात ५ बाद १८३ धावाच करता आल्या.
तत्पूर्वी, या सामन्यात आंद्रे रसेलने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. आंद्रे रसेलने फिरकी गोलंदाज ॲडम झम्पाच्या एका षटकात ४ षटकार आणि १ चौकार ठोकत २८ धावा कुटल्या. रसेलला शेरफेन रदरफोर्डने चांगली साथ दिली. दोघांमध्ये ५० हून अधिक धावांची भागीदारी झाली.
आंद्रे रसेलने डावाच्या १९व्या षटकात झाम्पाची धुलाई केली. रसेलने लेगस्पिनर ॲडम झम्पाच्या या षटकाची सुरुवात षटकार मारून केली. दुसरा चेंडू डॉट होता. रसेलने तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. यानंतर रसेल थांबला नाही आणि त्याने शेवटच्या सलग ३ चेंडूंवर षटकार ठोकले. अशाप्रकारे आंद्रे रसेलने या षटकात २८ धावा कुटल्या.
सामन्यात आंद्रे रसेलने केवळ २९ चेंडूत ७ षटकार आणि ४ चौकार मारत ७१ धावांची तुफानी खेळी खेळली. रसेल ६व्या तर रुदरफोर्ड ७व्या क्रमांकावर फलंदाजीला आले होते. दोघांनी अर्धशतके ठोकली. रुदरफोर्डने ४० चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या साह्याने ६७ धावा केल्या.