भारत आणि इंग्लंड यांच्यातील राजकोट कसोटीत सरफराज खानने धमाकेदार पदार्पण केले. पदार्पणातच अर्धशतक झळकावताना सरफराजने ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६६ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. मात्र, त्याला या खेळीचे शतकात रूपांतर करता आले नाही.
दरम्यान, सरफराज खानच्या इथवरच्या प्रवासात त्याच्या वडिलांचे खूप मोठे योगदान आहे. यामुळे महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सरफराज खानचे वडील नौशाद यांना महिंद्रा थार भेट देण्याची घोषणा केली आहे.
सोशल मीडियावर बीसीसीआयचा एक व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा म्हणाले, की ‘कष्ट, धैर्य आणि संयम यापेक्षा एक वडील आपल्या मुलामध्ये कोणते चांगले गुण विकसित करू शकतात? प्रेरणादायी पिता म्हणून नौशाद खान यांना थार भेट देणे हा माझ्यासाठी सन्मान आहे’.
विशेष म्हणजे, सरफराजच्या डेब्यूनंतर त्याचे वडील नौशाद खान हेदेखील चांगलेच चर्चेत आले आहेत. सरफराजचा पदार्पणाचा सामना पाहण्यासाठी त्याचे वडील नौशाद खान राजकोटला पोहोचले होते.
अनिल कुंबळेकडून पदार्पणाची कॅप मिळाल्यानंतर सरफराज वडिलांकडे धावत गेला. त्यानंतर दोघांनाही अश्रू अनावर झाले, नौशाद यांनी सरफराजच्या टोपीचे चुंबन घेतले. हे दृश्य पाहून सगळेच भावूक झाले.
सरफराज खान आणि मुशीर खानच्या प्रवासात नौशाद खान यांचे खूप मोठे योगदान आहे. मुलांच्या क्रिकेटसाठी ते उत्तर प्रदेशातून मुंबईत आले. नौशाद यांनीच आपल्या मुलांना क्रिकेटचे ट्रेनिंग दिले. गेल्या १५ वर्षांपासून ते मुलांवर मेहनत घेत आहेत. या मेहनतीचे फळ नौशाद यांना मिळाले आहे.
मुशीर खानदेखील नुकताच टीम इंडियाकडून अंडर १९ वर्ल्डकप खेळून आला आहे. त्याने या वर्ल्डकपमध्ये २ शतकं ठोकली होती. त्याच्या भावाप्रमाणेच मुशीरही त्याच्या दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो.