भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आजपासून (२३ फेब्रुवारी) रांची येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
तत्पूर्वी, या रांची कसोटीतून बंगालचा वेगवान गोलंदाज आकाश दीप सिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल यांनी आकाश दीपला डेब्यू टेस्ट कॅप दिली. पदार्पणाच्या या खास प्रसंगी आकाश दीपची आई आणि त्याचा भाऊही मैदानावर उपस्थित होते.
आकाश दीपने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार पदार्पण केले आहे. हे वृत्त लिहिपर्यंत आकाशदीपने ५ षटके गोलंदीजी केली असून इंग्लंडच्या तीन फलंदाजांची शिकार केली आहे.
जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या डावात इंग्लंडला दमदार सुरुवात करून दिली. पण यानंतर आकाश दीपने बेन डकेटची विकेट घेतली. ११ धावा करून डकेट विकेटकीपरच्या हाती झेलबाद झाला. आकाशदीपची ही पहिली आंतरराष्ट्रीय विकेट ठरली. यानंतर याच षटकात त्याने ओली पोपला पायचीत केले. पोप शून्यावर बाद झाला. यानंतर आकाशदीपने वेगवान फलंदाजी करणाऱ्या झॅक क्रॉलीला क्लीन बोल्ड केले.
विशेष म्हणजे, इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या या कसोटी मालिकेत पदार्पण करणारा आकाश दीप टीम इंडियाचा चौथा खेळाडू ठरला आहे. आकाशच्या आधी रजत पाटीदार, ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांनीही या कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये आकाश दीपने सातत्याने आपल्या सीम बॉलिंगने सर्वांना प्रभावित केले आहे. या कसोटी मालिकेपूर्वी त्याने इंग्लंड अ संघाविरुद्धही चांगली गोलंदाजी केली होती, त्यामुळे त्याचा टीम इंडियाच्या संघात समावेश करण्यात आला.
आकाश दीप चेंडूला आत-बाहेर स्विंग करण्यात अत्यंत पटाईत मानला जातो. याचे उदाहरण इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळाले आहे.
आकाश दीपने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण ६ सामने खेळले आहेत. आयपीएल २०२२ मध्ये त्याला ५ सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने ५ विकेट घेतल्या. तर आयपीएल २०२३ मध्ये तो फक्त एक सामना खेळू शकला होता.
संबंधित बातम्या