Akash Deep Six Virat Kohli Bat : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी आपल्या पहिल्या डावात अतिशय वेगवान फलंदाजी केली.
WTC च्या गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करण्यासाठी हा सामना जिंकणे भारतासाठी अतिशय महत्वाचे आहे. तर या सामन्याचे दोन दिवस पावसात वाहून गेले आहेत. अशा स्थितीत सामन्यात केवळ दोन दिवसांचा खेळ शिल्लक होता, अशा स्थितीत टीम इंडियाने ड्रॉकडे जाणाऱ्या सामन्यात जीव आणला आहे.
बांगलादेशने पहिल्या डावात २३३ धावा केल्या, प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनी वादळी फलंदाजी केली. टीम इंडियाचे फलंदाज पहिल्या चेंडूपासून आक्रमक दिसत होते, यात रोहित शर्मापासून सर्वांनी १०० हून अधिकच्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. यामध्ये केवळ ऋषभ पंत काहीच करू शकला नाही.
शेवटी गोलंदाज आकाश दीप यानेही एकाच षटकात २ षटकार ठोकत आपला दम दाखवून दिला. विशेष म्हणजे, आकाशदीपने हे षटकार विराट कोहलीच्या बॅटने लगावले. ही मालिका सुरू होण्याआधीच विराट कोहलीने कसोटी संघातील नवा वेगवान गोलंदाज आकाश दीप याला त्याची बॅट भेट दिली होती.
कानपूर कसोटीत आकाश दीप फलंदाजीला आला तेव्हा विराटची बॅट घेऊन आला. भारतीय संघाच्या डावाच्या ३४व्या षटकात तो फलंदाजीला आला. बांगलादेशकडून शाकिब अल हसन हे षटक टाकत होता.
आकाशने पहिल्याच चेंडूवर बॅट फिरवली, पण यावर त्याला एकही धाव मिळाली नाही. पण यानंतर पुढच्या दोन चेंडूंवर त्याने लांब षटकार ठोकले. षटकार मारण्याच्या प्रयत्नात आकाश बाऊंड्री लाइनवर झेलबाद झाला. त्याने ४ चेंडूत १२ धावा केल्या.
जेव्हा आकाश दीपने बॅक टू बॅक सिक्स मारले तेव्हा डगआउटमध्ये बसलेला विराट कोहली खूपच हसताना दिसला. त्याची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली. विराटने जेव्हा आकाश दीपला बॅट गिफ्ट केली तेव्हा आकाशदीने या बॅटचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता.
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर बांगलादेशने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या डावात २३३ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ९ विकेट्सवर २८५धावा करून डाव घोषित केला. भारताने केवळ ३४ षटकात या २८५ धावा ठोकल्या. भारताला आता ५२ धावांची आघाडी मिळाली. यानंतर बांगलादेशने चौथ्या दिवशी त्यांच्या दुसऱ्या डावात २६ धावांच्या स्कोअरवर २ विकेट गमावल्या आहेत.
तत्पूर्वी, भारतीय संघाचा रनमशीन विराट कोहलीनेही कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात एक खास विक्रम केला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७००० धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो केवळ चौथा आणि दुसरा भारतीय खेळाडू ठरला
किंग कोहलीने कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात ४७ धावा केल्या, ज्यात त्याच्या बॅटमधून ४ चौकार आणि १ षटकार आला.