Sunil Gavaskar On Rohit Sharma: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर स्पर्धेत बीसीसीआयच्या निवड समितीने कर्णधार बदलावा, असे मत टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि अनुभवी क्रिकेट तज्ज्ञ सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. पर्थमध्ये २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्मा उपलब्ध राहणार नसल्याचे वृत्त आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून जसप्रीत बुमराहला मालिकेसाठी कर्णधार करावे. नंतर रोहित परतला तर त्याला फलंदाज म्हणून खेळवावे, सुनील गावस्कर म्हणाले.
रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह गरोदर असून ती दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याची माहिती अभिनव मुकुंदने दिली. त्यामुळे रोहित शर्मा पर्थमधील मालिकेतील पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. याचबरोबर तो दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही? याबाबतही अस्पष्टता आहे. मुंबईतील प्रसारमाध्यमांनी रोहितला विचारले असता त्याने याबाबत काहीच स्पष्ट केले नाही.
या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सुनील गावस्कर म्हणाले की, ‘अजित आगरकर यांनी संघात थोडी स्पष्टता आणावी आणि बुमराहला संपूर्ण दौऱ्यासाठी कर्णधार म्हणून घोषित करावे. विशेषत: गेल्या आठवड्यात न्यूझीलंडविरुद्धच्या घरगुती कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. हे लक्षात घेता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधाराची उपस्थिती महत्त्वाची आहे,’ असे त्यांनी म्हटले.
पुढे सुनील गावस्कर म्हणाले की, ‘कर्णधाराने पहिली कसोटी खेळली पाहिजे. त्याला दुखापत झाली असती तर वेगळी गोष्ट आहे. पण मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार उपलब्ध नसता तर उपकर्णधारावर खूप दडपण येते आणि ते सोपे नसते. रोहित पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याशिवाय, दुसऱ्या कसोटीसाठी त्याच्या उपलब्धतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आगरकरांनी त्याला आत्ताच सांगावे की, तुला विश्रांती हवी आहे तर, घेऊ शकतो. तुला हवे तेव्हा तू संघात सामील होऊ शकतो. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आम्ही पकर्णधाराला कर्णधार बनवत आहोत, असे स्पष्ट केले पाहिजे. कारण न्यूझीलंडविरुद्ध आम्ही ०-३ ने पराभूत झालो, त्यामुळे कर्णधार असायला हवा. भारताने न्यूझीलंडची मालिका ३-० ने जिंकली असती तर गोष्ट वेगळी होती.’
सुनील गावस्कर यांनी २०२१-२२ च्या दौऱ्याचे ही उदाहरण दिले, जेव्हा विराट कोहली आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी पहिला कसोटी सामना खेळून भारतात परतला होता. त्यावेळी विराट पहिला कसोटी सामना खेळून मायदेशी परतणार हे सर्वांना माहित होते. गावस्कर म्हणाले, 'त्यावेळी स्पष्टता होती. आम्हाला माहित होते की, कोहली फक्त एक कसोटी सामना खेळेल आणि त्यानंतर उपकर्णधार पदभार स्वीकारेल, ज्यामुळे उर्वरित खेळाडूंना ही वस्तुस्थिती स्वीकारणे सोपे झाले. मात्र, रोहित शर्माबाबत तसे नाही.