हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवला टी-२० संघाच्या कर्णधारपदी का नेमण्यात आले? अजित आगरकर स्पष्टच बोलले
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवला टी-२० संघाच्या कर्णधारपदी का नेमण्यात आले? अजित आगरकर स्पष्टच बोलले

हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवला टी-२० संघाच्या कर्णधारपदी का नेमण्यात आले? अजित आगरकर स्पष्टच बोलले

Updated Jul 22, 2024 11:06 AM IST

Ajit Agarkar On Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवला भारतीय टी-२० संघाचा कर्णधार बनवण्याच्या निर्णयाबद्दल अजित आगरकर काय म्हणाले? वाचा

भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदी सूर्याकुमार यादवची वर्णी
भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदी सूर्याकुमार यादवची वर्णी (Surjeet Yadav)

Hardik Pandya vs Suryakumar Yadav: गेल्या महिन्यात बार्बाडोस येथे झालेल्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवला भारताचा नवा टी-२० कर्णधार का बनवण्यात आले. मात्र, त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले. यावर बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी सोमवारी मोठा खुलासा केला.

'हार्दिक हा अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्याकडे असे कौशल्य आहे, जे शोधणे खूप कठीण आहे. गेल्या दोन वर्षांपासून फिटनेस हे त्याच्यासाठी एक आव्हान होते. प्रशिक्षक आणि निवडकर्ता म्हणून हे कठीण असते. २०२६ च्या विश्वचषकापर्यंत आम्हाला काही गोष्टी पाहायच्या आहेत. तेच मुख्य आव्हान होते. असा त्यामागचा विचार होता. आम्हाला तो हवा होता, जो नेहमी उपलब्ध असेल,' असे अजितकरने श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी सांगितले.

आगरकर पुढे म्हणाले की, ‘सूर्यकुमारची नियुक्ती निवड समितीला उर्वरित भारतीय खेळाडूंकडून मिळालेल्या अभिप्रायामुळे झाली. सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आले, कारण तो सर्वात योग्य उमेदवारांपैकी एक आहे. तो जगातील सर्वोत्तम टी-२० फलंदाजांपैकी एक आहे आणि तो सर्व सामने खेळण्याची शक्यता आहे. कर्णधार म्हणून यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेला गुण सूर्याकुमार यादवकडे आहे.’

आधी ऑक्टोबरमध्ये २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान हार्दिकला गुडघ्याला दुखापत झाली. त्यानंतर तो स्पर्धेतून बाहेर पडला होता आणि त्यानंतर आयपीएल २०२४ च्या सुरूवातीपर्यंत तो क्रिकेटपासून दूर होता. २०२२ च्या सुरुवातीपासून भारताने खेळलेल्या ७९ टी-२० सामन्यांपैकी तो केवळ ४६ सामने खेळला आहे. दुसरीकडे, सूर्यकुमारने यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई राज्य संघाचे नेतृत्व केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकानंतर सलग टी-२० मालिकेत भारताचे नेतृत्व केले, जिथे भारताने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-१ असा विजय मिळवला, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत १-१ अशी मालिका बरोबरीत सुटली.

भारत- श्रीलंका टी-२० मालिकेला २७ जुलैपासून सुरुवात

भारतीय संघाचा अधिकृत टी-२० कर्णधार म्हणून सूर्यकुमारची पहिली जबाबदारी श्रीलंकेचा दौरा असेल जिथे संघ २७ ते ३० जुलैदरम्यान तीन टी-२० सामने खेळणार आहे. नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीरची ही पहिलीच जबाबदारी असेल. हार्दिक या मालिकेचा भाग असेल, पण त्याला उपकर्णधारपदावरूनही हटवण्यात आले असून या महिन्याच्या सुरुवातीला झिम्बाब्वेमध्ये भारताला ४-१ असा विजय मिळवून देणारा शुभमन गिल या पदावर विराजमान झाला आहे.

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या