मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेचं करिअर संपलं? टीम इंडिया सोडाच, मुंबई संघातूनही मिळू शकतो नारळ!

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेचं करिअर संपलं? टीम इंडिया सोडाच, मुंबई संघातूनही मिळू शकतो नारळ!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 28, 2024 04:08 PM IST

Ajinkya Rahane, Team India : अजिंक्य रहाणेचा हाच फॉर्म कायम राहिला तर टीम इंडियात पुनरागमन करणे त्याच्यासाठी खूप कठीण जाईल. तसेच, त्याला मुंबई संघातूनही वगळले जाऊ शकते.

 ajinkya rahane
ajinkya rahane

Ajinkya Rahane, Indian Cricket Team :  टीम इंडियाचे कर्णधारपद भुषवलेल्या अजिंक्य रहाणेची कारकीर्द आता संपण्याच्या मार्गावर आहे. एक काळ असा होता, की तो संघाचा कणा मानला जायचा. संपूर्ण मधली फळी त्याच्या भरवशावर होती. रहाणेने प्रतिकूल परिस्थितीत भारतीय संघासाठी अनेक मॅचविनिंग इनिंग खेळल्या आहेत.

त्याने २०११ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सध्या तो कारकिर्दीतील सर्वात वाईट फॉर्ममधून जात आहे. अजिंक्य रहाणेची सध्याची कामगिरी पाहता त्याला केवळ टीम इंडियातच नाही तर मुंबईच्या रणजी संघातही जागा मिळणे कठीण झाले आहे.

अजिंक्य रहाणे सध्या रणजी ट्रॉफी २०२३-२४ मध्ये मुंबईचे नेतृत्व करत आहे. रहाणेने भारतासाठी शेवटची कसोटी जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली होती. मात्र त्यानंतर त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळवता आलेले नाही. अशा परिस्थितीत त्याचे भारतासाठी १०० कसोटी खेळण्याचे स्वप्न स्वप्नच राहण्याची शक्यता आहे.

रहाणेने यावर्षी जानेवारीत सांगितले होते की, त्याला भारतासाठी १०० कसोटी खेळायचे आहेत. मात्र त्याचे स्वप्न पूर्ण होईल असे वाटत नाही. रणजी ट्रॉफीमध्येही रहाणे पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.

यंदाच्या रणजी हंगामात रहाणेने आतापर्यंत ६ सामन्यात केवळ एकच अर्धशतक झळकावले आहे. याशिवाय अनेक वेळा तो सिंगल डिजिट स्कोअरवर बाद झाला आणि तीन वेळा त्याला खातेही उघडता आले नाही. रहाणेचा खराब फॉर्म पाहता आता टीम इंडियात पुनरागमन करणे त्याच्यासाठी शक्य नाही, असे म्हणता येईल. 

सरफराज आणि जुरेलने अडचणी वाढवल्या

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिला खेळली जात आहे. या मालिकेत सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल या फलंदाजांनी भारतासाठी पदार्पण केले. या खेळाडूंनी मधल्या फळीत चमकदार खेळ केला. यामुळे रहाणेचा मधल्या फळीतील फलंदाज म्हणून टीम इंडियात प्रवेश मिळवण्याचा मार्ग बंद झाला आहे.

अजिंक्य रहाणेने भारतासाठी ८५ कसोटी खेळल्या 

अजिंक्य रहाणेने भारतासाठी आतापर्यंत एकूण ८५ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १४४ डावात फलंदाजी करताना ३८.४६ च्या सरासरीने ५०७७ धावा केल्या आहेत. यात त्याने १२ शतके आणि २६ अर्धशतके केली आहेत.

IPL_Entry_Point