स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे बऱ्याच दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे. पण अजिंक्य रहाणेने इंग्लंडमध्ये जाऊन काउंटी क्रिकेटमध्ये शतक ठोकले. यानंतर त्याच्या नेतृत्वात मुंबई इराणी कपचे जेतेपद मिळवले. यानंतर आता अजिंक्य रहाणे टीम इंडियात येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
अजिंक्य रहाणेने मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने पहिल्या डावात ९७ धावा ठोकल्या. यानंतर अजिंक्य रहाणे लवकरच भारतीय संघात पुनरागमन करू शकेल, अशी अटकळ बांधली जात आहे.
याआधी अजिंक्य रहाणे जुलै २०२३ मध्ये भारताकडून शेवटची कसोटी खेळला होता. भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. पण काउंटी क्रिकेट आणि इराणी कपमधील चमकदार कामगिरीनंतर पुनरागमनाची आशा आहे.
आता भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. आता न्यूझीलंड मालिकेत अजिंक्य रहाणेला संधी मिळणार का, हा प्रश्न आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणेचे पुनरागमन होऊ शकते, असे मानले जात आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी १६ ऑक्टोबरपासून खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर या मालिकेनंतर भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची पहिली कसोटी २२ नोव्हेंबरपासून खेळवली जाणार आहे. यापूर्वी जेव्हा भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता, तेव्हा अजिंक्य रहाणे त्या संघाचा भाग होता. विशेष म्हणजे त्याच्या नेतृत्वात भारताने कसोटी मालिका २-१ ने जिंकली होती.