Ajinkya Rahane Kolkata Knight Riders Captain : इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाने आयपीएल २०२५ साठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. केकेआरने भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेल्या अजिंक्य रहाणे याची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.तर केकेआरने अष्टपैलू व्यंकटेश अय्यर याला उपकर्णधारपद दिले आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने अधिकृतपणे अजिंक्य रहाणे याची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. अष्टपैलू व्यंकटेश अय्यरला उपकर्णधारपद मिळाले आहे, त्याला फ्रँचायझीने २३.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
नवीन कर्णधाराची घोषणा करताना केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर म्हणाले, “अजिंक्य रहाणेसारखा कोणीतरी मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. जो नेता म्हणून त्याचा अनुभव आणि परिपक्वता आणतो. शिवाय, व्यंकटेश अय्यर केकेआरचा फ्रँचायझी खेळाडू आहे आणि त्याच्याकडे नेतृत्वगुण भरपूर आहेत. आम्हाला विश्वास आहे की जेव्हा आम्ही आमच्या जेतेपदाच्या बचावाची सुरुवात करू तेव्हा ते एक चांगले संयोजन असतील.'
केकेआरचे कर्णधारपद मिळाल्यावर अजिंक्य रहाणे म्हणाला, "आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करणे ही सन्मानाची गोष्ट आहे. मला वाटते की आमच्याकडे एक उत्तम आणि संतुलित संघ आहे. मी सर्वांसोबत काम करण्यास आणि आमच्या विजेतेपदाचे रक्षण करण्याचे आव्हान स्वीकारण्यास उत्सुक आहे."
कोलकाताने आयपीएल २०२४ चे विजेतेपद पटकावले होते. केकेआरने फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता. श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वाखाली केकेआर चॅम्पियन बनले, परंतु आयपीएल २०२५ लिलावापूर्वी केकेआरने आपला चॅम्पियन कर्णधार श्रेयस अय्यरला सोडले. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. तेव्हापासून संघ नवीन कर्णधाराच्या शोधात होता. आगामी आयपीएल २२ मार्चपासून सुरू होणार आहे. आता KKR रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे.
विशेष म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल २०२५ मधील सलामीची सामना खेळणार आहे. २२ मार्च रोजी कोलकाताचा सामना रजत पाटीदारच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध होणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. आरसीबीनेही नुकतेच आयपीएलच्या आगामी हंगामासाठी रजत पाटीदारची कर्णधारपदी निवड केली होती.
आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी केकेआरने आंद्रे रसेल, सुनील नारायण, रिंकू सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि रमनदीप सिंग या खेळाडूंना रिटेन केले.
हर्षित आणि रमनदीप यांनी ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत भारतीय संघात पदार्पण केले नसल्याने फ्रँचायझीने त्यांना अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन केले.
लिलावात केकेआरने क्विंटन डी कॉक, रोव्हमन पॉवेल, मोईन अली, स्पेन्सर जॉन्सन, एनरिच नॉर्खिया आणि उमरन मलिक यांना संघात घेतले.
आयपीएल २०२५ साठी केकेआर संघ : अजिंक्य रहाणे कर्णधार, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमनदीप सिंग, व्यंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानुल्ला गुरबाज, एनरिच नॉर्खिया, अंगक्रीश रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, रोव्हमन पॉवेल, मनीष पांडे, स्पेन्सर जॉन्सन, लवनीथ सिसोदिया, अनुकूल रॉय, मोईन अली, उमरन मलिक
संबंधित बातम्या