भारतीय संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत आहे. मुंबईकडून खेळताना रहाणेच्या बॅटला आग लागली आहे. तो सतत तुफानी खेळी खेळत आहे. त्याची ही फलंदाजी पाहून कोलकाता नाईट रायडर्स संघाने सुटकेचा नि:श्वास सोडला असेल.
कारण आयपीएल २०२५ साठीच्या मेगा लिलावात कोलकाताने रहाणेला विकत घेतले आहे. या फलंदाजाने शुक्रवारी बडोद्याविरुद्धच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत तुफानी खेळी करत पुन्हा खळबळ उडवून दिली.
केकेआरने रहाणेला त्याच्या मूळ किमतीत दीड कोटी रुपयांना विकत घेतले आणि सध्या हा उजव्या हाताचा फलंदाज ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे, ते पाहता केकेआर संघाला वाटत असेल की, संघाने जेवढे पैसे खर्च केले त्यापेक्षा अधिक मिळाले आहे.
रहाणेचे बडोद्याविरुद्धचे शतक हुकले, पण दिग्गज टी-20 फलंदाज सूर्यकुमार यादवही त्याच्या फलंदाजीपुढे फिका पडलेला दिसला.
रहाणेने एका टोकाने झटपट धावा केल्या आणि संघाला ६ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना बडोद्याने २० षटकात ७ गडी गमावून १५८ धावा केल्या. रहाणे पृथ्वी शॉसोबत मुंबईसाठी डावाची सुरुवात करण्यासाठी आला. शॉ पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि ८ धावा करून बाद झाला.
यानंतर रहाणेला कर्णधार श्रेयस अय्यरची साथ मिळाली. या दोघांनीही बडोद्याच्या गोलंदाजांची धुलाई केली, त्यात हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्या यांच्या नावाचाही समावेश होता.
एकूण ११८ धावांवर अय्यर अतित सेठचा बळी ठरला. त्याने ३० चेंडूत ४६ धावा केल्या. तरीही रहाणे थांबला नाही आणि धावा करत राहिला. रहाणे आपले शतक पूर्ण करेल असे वाटत होते, पण ते २ धावांनी हुकले. अभिमन्यू सिंग राजपूतने रहाणेला आपला शिकार बनवले.
५६ चेंडूंचा सामना करताना त्याने ११ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ९६ धावा केल्या. सूर्यकुमार यादवला एकच धाव करता आली. रहाणे बाद झाल्यानंतर सुर्यांश शेडगेने षटकार ठोकत संघाला संघाला अंतिम फेरीत नेले.
रहाणे या टी-20 स्पर्धेत सातत्याने धावा करत आहे. आंध्र प्रदेशविरुद्ध त्याने ९५ धावांची खेळी खेळली होती. यानंतर त्याने विदर्भाविरुद्ध ८४ धावा केल्या. रहाणेच्या बॅटने आज बडोद्याविरुद्ध पुन्हा जोर धरला आणि शतक हुकले असले तरी सलग तिसऱ्यांदा अर्धशतक झळकावण्यात तो यशस्वी ठरला.
संबंधित बातम्या