भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याचे नाव हळूहळू टीम इंडियातून गायब होत चालले आहे. राहुलला आधीच टी-20 संघातून वगळण्यात आले होते, आता त्याला कसोटी संघातूनही वगळण्याची योजना असल्याचे दिसते आहे.
भारतीय संघाचा माजी फलंदाज आकाश चोप्राने केएल राहुलला कसोटी संघातून कशा पद्धतीने वगळले जाऊ शकते हे स्पष्ट केले.
बहुप्रतिक्षित दुलीप ट्रॉफी स्पर्धा ५ सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. अनेक भारतीय खेळाडू या ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहेत, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनुभवी आहेत. दुलीप ट्रॉफी खेळणाऱ्यांच्या यादीत केएल राहुलचेही नाव आहे.
बीसीसीआयने दुलीप ट्रॉफीसाठी ४ संघांची घोषणा केली होती, ज्यामध्ये केएल राहुल 'अ' संघाचा भाग आहे. राहुलसोबत या संघात यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल देखील आहे, ज्यावर आकाश चोप्राने चिंता व्यक्त करत धक्कादायक गणित मांडले केले.
त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, "केएल राहुल ध्रुव जुरेलच्या दुलीप ट्रॉफी संघात आहे. मला वाटते की ध्रुव जुरेल विकेटकीपर म्हणून खेळेल याचा अर्थ केएल राहुल तुमचा कसोटीत विकेटकीपर नसेल."
भारतीय पुरुष संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी त्यांच्या एका पत्रकार परिषदेत सांगितले होते की, निवड समिती सध्या राहुलचा T20 संघाच्या सेटअपमध्ये विचार करत नाही. राहुलची २०२४ च्या टी २० विश्वचषकासाठीही निवड झाली नव्हती.
याशिवाय श्रीलंका दौऱ्यावर झालेल्या टी-20 मालिकेतूनही राहुलचे नाव गायब होते. राहुलने नोव्हेंबर २०२२ मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला, जो २०२२ टी-20 विश्वचषक स्पर्धेचा उपांत्य सामना होता. आता राहुल टी-20 मध्ये पुनरागमन करतो की कायमचा बाहेर पडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.