पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याने एकदिवसीय आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे अचानक नवीन कर्णधार निवडण्याचे आव्हान पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर आहे. बाबरच्या राजीनाम्यानंतर पीसीबीने (PCB) आता कर्णधारपदाचा अनुभव असलेल्या खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले आहे.
यामध्ये मोहम्मद रिझवान, शादाब खान आणि शाहीन शाह आफ्रिदी यांचा समावेश आहे.
बाबर आझमच्या जागी कोणाला कर्णधार बनवायचे? हा पीसीबीसमोरचा प्रश्न आहे. पाकिस्तानला आगामी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेसारख्या बलाढ्य संघांचा सामना करावा लागणार आहे. तसेच, चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपदही पाकिस्तानकडे आहे. यामुळे घरच्या चाहत्यांसमोर कामगिरी करण्याचा दबाव पाकिस्तानी संघावर असेल, अशा परिस्थितीत लवकरात लवकर नवीन कर्णधाराची निवड करणे गरजेचे झाले आहे.
मोहम्मद रिझवान याला पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये मुलतान सुलतान संघाचे कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे, परंतु त्याला आंतरराष्ट्रीय व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये कर्णधारपदाच्या फारशा संधी मिळालेल्या नाहीत. बाबर आझमच्या जागी पीसीबी त्याचा विचार करते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. रिझवानची क्षमता लक्षात घेता त्याच्या नावाचा विचार करता येईल.
शादाब खान याने वयाच्या २२व्या वर्षी पाकिस्तानचे कर्णधारपद स्वीकारले आणि तो देशाचा सर्वात तरुण कर्णधार बनला. तो पीएसएलमध्ये इस्लामाबाद युनायटेडचे कर्णधार आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विजेतेपदही पटकावले आहे. अलीकडेच, त्याने देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा चॅम्पियन्स वनडे कप स्पर्धेतही आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
शाहीन शाह आफ्रिदीने ५ टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले आहे, ज्यापैकी त्याने फक्त १ सामना जिंकला आहे आणि ४ मध्ये पराभव झाला आहे. हा आकडा चांगला नसला तरी त्याला कर्णधारपदाच्या फारशा संधी मिळालेल्या नाहीत हेही खरे आहे.
शाहीनने पीएसएलमध्येही दोन विजेतेपद पटकावले असून अलीकडेच त्याला टी-20 च्या कर्णधारपदावरून अचानक काढून टाकण्यात आले होते. बाबरच्या राजीनाम्यानंतर पीसीबी शाहीनला आणखी एक संधी देण्याचा विचार करू शकते.