क्रिकेट जगतातून एक मोठी आणि रंजक बातमी समोर येत आहे. एका रिपोर्टनुसार, भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघात एकत्र खेळताना दिसणार आहेत. दोन्ही देशांचे खेळाडू संघमित्र बनू शकतात.
आता तुम्ही विचार करत असाल की दोन्ही देशांचे खेळाडू एकमेकांविरुद्ध मोठ्या संघर्षानंतर खेळतात, तर मग ते एकाच संघात कसे काय खेळू शकतील?
खरं तर, आफ्रो-आशिया कपच्या माध्यमातून भारताचा विराट कोहली आणि पाकिस्तानचा बाबर आझम एकाच संघात खेळताना दिसू शकतात.
आफ्रो-आशिया कप पुन्हा सुरू होणार असल्याच्या बातम्या जोर धरत आहेत. आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष समोद दामोदर यांनी ही बातमी पसरवली आहे.
आफ्रो-आशिया कप ही स्पर्धा शेवटच्या वेळी २००७ मध्ये खेळली गेली होती, ज्यामध्ये आशिया इलेव्हन आणि आफ्रिका इलेव्हन यांच्यात सामना झाला होता. आता हा चषक पुन्हा सुरू झाला तर विराट कोहली आणि बाबर आझमसारखे अनेक भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडू एकत्र खेळताना दिसू शकतील.
दामोदर यांनी फोर्ब्सला सांगितले, की "वैयक्तिकरित्या, मला खूप वाईट वाटते की ही स्पर्धा झाली नाही. एसीएला आवश्यक गती मिळाली नाही, परंतु त्यावर पुनर्विचार केला जात आहे. मला वाटते की ही मूलभूतपणे समजूतदारपणाची कमतरता आहे आणि आमच्या सदस्यांना याबद्दल खेद वाटतो." ही संकल्पना आफ्रिकेतून पुढे नेणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, आफ्रो-एशिया कप स्पर्धा दोन वर्षांपूर्वीच म्हणजे २०२२ मध्ये पुन्हा सुरू होणार होती, परंतु आशियाई क्रिकेट संघटनेतील अंतर्गत गोंधळामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही.
दामोदर पुढे म्हणाले, "हे सामने राजकीयदृष्ट्या अस्तित्वात असलेले अडथळे दूर करू शकतात. क्रिकेट त्यांना तोडण्याऐवजी जोडण्यास मदत करू शकते. खेळाडू एकमेकांच्या विरोधात आहेत यावर माझा वैयक्तिक विश्वास नाही, म्हणून मला विश्वास आहे की ते या स्पर्धेसाठी तयार असतील. "