Afghanistan vs Australia Todyas Match : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील १० वा सामना आज (२८ फेब्रुवारी) ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जात आहे. ब गटातील हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सुरू असून या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २७४ धावांचे लक्ष्य दिले आहे.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजीस आलेल्या अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला उमरझाई याने ६३ चेंडूत ५ षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने ६७ धावा केल्या आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सेदीकुल्लाह अटल यानेही ८५ धावांची खेळी केली.
प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली होती आणि पहिल्याच षटकातच त्यांना पहिला मोठा धक्का बसला. रहमानउल्ला गुरबाजला खाते न उघडता स्पेन्सर जॉन्सनने बोल्ड केले. यानंतर सेदीकुल्लाह अटल आणि इब्राहिम झद्रान यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली.
झद्रान (२२) ॲडम झाम्पाच्या गोलंदाजीवर मार्नस लॅबुशेनच्या हाती झेलबाद झाला. तर अनुभवी फलंदाज रहमत शाह (१२) ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर यष्टिरक्षक जोश इंग्लिसकरवी झेलबाद झाला. रहमत बाद झाला तेव्हा अफगाणिस्तानची धावसंख्या ३ गड्यांच्या मोबदल्यात ९१ धावा होती.
रहमत शाह बाद झाल्यानंतर काही वेळातच सेदीकुल्ला अटल याने आपले अर्धशतक पूर्ण केले. अटल पूर्णपणे लयीत दिसला आणि त्याने काही हवाई शॉट्सही खेळले. अटलने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. पण यानंतर स्पेन्सर जॉन्सनने अटलला स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली.
सेदीकुल्लाह अटलने ९५ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ८५ धावा केल्या. ज्यामध्ये 6 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.
त्यानंतर अफगाणिस्तानची पाचवी विकेट कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीच्या (२०) रूपाने पडली, जो ॲडम झाम्पाच्या गोलंदाजीवर मार्नस लॅबुशेनच्या हाती झेलबाद झाला. अफगाण संघाच्या विकेट्स पडण्याची प्रक्रिया सुरूच होती. मोहम्मद नबी (१) दुर्दैवाने धावबाद झाला. तर गुलबदीन नायब अवघ्या ४ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर नॅथन एलिसच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
यानंतर अजमतुल्ला उमरझाई आणि राशिद खान यांनी मिळून आठव्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी केली. राशिदने १९ धावा केल्या आणि बेन द्वारशुईसच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलकरवी झेलबाद झाला. येथून अजमतुल्ला उमरझाईने जबाबदारी स्वीकारली आणि आक्रमक फलंदाजी करत अफगाण संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले.
संबंधित बातम्या