टी-20 वर्ल्डकप २०२४ कोणताही संघ जिंको, पण हा वर्ल्डकप अफगाणिस्तानमुळे सर्वांच्या स्मरणात राहील. अफगाणिस्तानच्या संघाने बलाढ्य संघांना त्यांच्यासमोर कसे गुडघे टेकायला लावले, हे संपूर्ण क्रिकेटजगताने पाहिले आहे.
अफगाणिस्तानने प्रथम न्यूझीलंड आणि नंतर ऑस्ट्रेलियाला पराभूत करून इतिहास रचला. यासह त्यांनी पहिल्यांदाच आयसीसी इव्हेंटच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानच्या या संघाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
अफगाणिस्तानने त्यांच्या शेवटच्या सुपर ८ सामन्यात बांगलादेशचा ८ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले. अफगाणिस्तानने उपांत्य फेरी गाठल्याबद्दल संपूर्ण क्रिकेट जगताकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.
राशिद खान आणि संघाने इतिहास रचल्यानंतर, अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान यांनी टीमचा कर्णधार म्हणजेच राशिद खानशी व्हिडिओ कॉलवर चर्चा केली. तो राशीदशी पश्तो भाषेत बोलत होते. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून ते संघाच्या कामगिरीवर खूप खूश असल्याचे दिसत होते. परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान यांनी उपांत्य फेरीत पोहोचल्याबद्दल राशिद खान आणि त्याच्या संघाचे अभिनंदन केले.
बांगलादेशविरुद्धच्या करा किंवा मरोच्या सामन्यात राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत ५ गडी गमावून ११५ धावा केल्या. रहमानउल्ला गुरबाजने संघाकडून सर्वाधिक ४३ धावांची खेळी खेळली. मात्र, अफगाणिस्तानच्या डावानंतर पावसाने हजेरी सावली पडला, त्यामुळे बांगलादेशच्या डावातून एक षटक वजा करण्यात आले आणि त्यांना १९ षटकांत ११४ धावांचे लक्ष्य मिळाले.
११४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप झाली आणि १७.५ षटकांत त्यांचा संघ १०५ धावांवर गारद झाला. अफगाणिस्तानकडून राशिद खान आणि नवीन उल हकने ४-४ विकेट घेतल्या. फजलहक फारुकी आणि गुलबदिन नायब यांनाही प्रत्येकी १ बळी मिळाला.
संबंधित बातम्या