South Africa vs Afghanistan ODI : अफगाणिस्तान क्रिकेट संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (२० सप्टेंबर) दक्षिण आफ्रिकेचा १७७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा ६ गडी राखून पराभव केला होता. अशा प्रकारे, राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान संघाने ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
मात्र, अफगाणिस्तानने मोठ्या संघांना पराभूत करून खळबळ माजवण्यची ही पहिलीच वेळ नाही. किंबहुना, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर अफगाणिस्तानचा विजय रथ थांबत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते आहे. या काळात अफगाणिस्तानने अनेक मोठ्या संघांना पराभूत केले आहे.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये अफगाणिस्तानने इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका सारख्या संघांना पराभूत करून खळवळ माजवली होती. त्याचबरोबर अफगाणिस्तान या स्पर्धेत गुणतालिकेत सहाव्या स्थानावर राहिला. अफगाणिस्तानची विजयी वाटचाल सुरूच होती.
अफगाणिस्तानने २०२४ च्या टी-20 विश्वचषकातही मोठा अपसेट निर्माण केला होता. या स्पर्धेत अफगाणिस्तानने न्यूझीलंड सोबतच ऑस्ट्रेलियाला पराभूत करून बाहेरचा रस्ता दाखवला होता. राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान क्रिकेट संघ टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मात्र त्यांना उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
त्याचवेळी, आता अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत पराभव केला आहे. या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा ६ गडी राखून पराभव केला. यानंतर दुसऱ्या वनडेत १७७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
तत्पूर्वी या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ४ गडी गमावून ३११ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून रहमनउल्लाह गुरबाजने शतकी खेळी केली. गुरबाज १०५ धावा करून बाद झाला तर रहमतने ५० धावांचे योगदान दिले. या दोघांनंतर अजमतुल्ला उमरझाईने शानदार खेळी केली. उमरझाईने ५० चेंडूत ६ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ८६ धावा केल्या, ज्याच्या जोरावर अफगाणिस्तानने ४ गडी गमावून ३११ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली. टेंबा बावुमा आणि टोनी डी जोर्जी यांच्यात पहिल्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी झाली. कर्णधार बावुमा ३८ धावा करून अजमतुल्लाचा बळी ठरला, तर टोनीला रशीद खानने बाद केले. रीझा हेंड्रिक्सने १७ धावांचे योगदान दिले. रीझा हेंड्रिक्सने १७ धावांचे योगदान दिले. यानंतर राशिद खान आणि नंगेलिया खरोटे यांच्या फिरकीची जादू चालली आणि दक्षिण आफ्रिकेने एकामागून एक विकेट गमावल्या.
दक्षिण आफ्रिकेने ७ धावांत ४ विकेट गमावल्या. राशिद खानने ३ फलंदाजांना बाद केले. ट्रिस्टन स्टब्स ५ धावा, काइल व्हेरीन २ धावा, वियान मुल्डर २ धावा आणि ब्योर्न फॉर्च्युइन खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. नंगेलिया खरोटेने ४ गडी बाद केले. शेवटी रशीद खानने एडन मार्करामला बाद करून आफ्रिकेची शेवटची आशा संपवली.
राशिद खानने ९ षटकांत १९ धावा देत ५ बळी घेतले. त्याचवेळी नांगेलियाने ६.२ षटकात २६ धावा देत ४ बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ १३४ धावांत गारद झाला. अफगाणिस्तानने प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली.
जर आपण आयसीसी क्रमवारीवर नजर टाकली तर अफगाणिस्तान कसोटी फॉर्मेटमध्ये १२व्या स्थानावर आहे. तर राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान वनडे क्रमवारीत ९व्या स्थानावर आहे. अफगाणिस्तान टी-20 फॉर्मेटमध्ये १०व्या स्थानावर आहे.