pakistan vs afganistan asian games 2023 : एशियन गेम्सच्या क्रिकेट स्पर्धेत आज (6 ऑक्टोबर) पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सेमी फायनलचा सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानला लाजिवरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासह पाकिस्तानचा संघ एशियन गेम्समधून बाहेर पडला आहे. तर अफगाणिस्तानचा संघ आता फायनलमध्ये भारताला भिडणार आहे.
सेमी फायनलच्या या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम पाकिस्तानला 115 धावांत गुंडाळले आणि त्यानंतर 17.5 षटकांत 6 गडी गमावून 116 धावा करून विजयाची नोंद केली. यासह आता आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेटची फायनल भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार, हे निश्चित झाले आहे. भारतीय संघाने आजच सेमी फानलमध्ये बांगलादेशचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला होता.
पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजीला आला तेव्हा अफगाण पठाणांनी मिर्झा बेगला 4 धावांवर धावबाद करून पाकिस्तानला पहिला धक्का दिला. यानंतर रोहेल नजीर 10, हैदर अली 2, कर्णधार कासिम अक्रम 9, खुशदील 8, आसिफ अली 8 हे एकापाठोपाठ एक पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यांच्यासाठी केवळ ओमेर युसूफ (24), रोहेल नझीर (10), अरफत मिन्हास (13) आणि आमेर जमाल (14) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला.
दुसरीकडे, अफगाणिस्तानकडून फरीद अहमदने सर्वाधिक 3, तर कैस अहमद आणि झहीर खानने 2-2 विकेट घेतल्या. कर्णधार गुलबदिन आणि करीम जनात यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
यानंतर या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाची सुरुवातही चांगली झाली नाही. त्यांचे दोन्ही सलामीवीर 35 धावांवर माघारी परतले. अटलने 5 धावांची तर मोहम्मद शहजादने 9 धावांची खेळी खेळली. यानंतर नूर अली जद्रानने 39 धावा, अफसर झझाईने 13 धावा आणि कर्णधार गुलबदिन नायबने नाबाद 26 धावा करत संघाला 4 गडी राखून विजय मिळवून दिला.
एके काळी पाकिस्तानी संघाने सामन्यात पुनरागमन केले होते, पण आमेर जमालने टाकलेल्या 18व्या षटकात गुलबदिनने विध्वंसक फलंदाजी केली आणि अफगाणिस्तानला 93 वरून 116 धावांवर नेले. या षटकात गुलबदीनने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. अशाप्रकारे पाकिस्तान सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता कांस्यपदकासाठी त्यांचा सामना बांगलादेशशी होणार आहे.
संबंधित बातम्या