AFG vs AUS T20 World Cup Highlights : अफगाणिस्तानने टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये मोठा दणका दिला आहे. त्यांनी ७ वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला आहे. सुपर ८ सामन्यात अफगाणिस्तानने २१ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने १४९नधावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ १२७ धावांवर सर्वबाद झाला.
अफगाणिस्तानकडून गुलाबदिन नायबने ४ बळी घेत कांगारूंचे कंबरडे मोडले. तर नवीन-उल-हकने ३ बळी घेतले. ऑस्ट्रेलियन संघाने ६ वेळा एकदिवसीय विश्वचषक आणि एकदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान संघाने २० षटकांत ६ गडी गमावून १४८ धावा केल्या होत्या. यादरम्यान सलामीवीर गुरबाजने ४९ चेंडूंचा सामना करत ६० धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले. इब्राहिम झद्रानने ५१ धावांची खेळी केली. त्याने ४८ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार मारले. यादरम्यान ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने ३ बळी घेतले. ॲडम झाम्पाने २ बळी घेतले.
कमी धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कांगारू संघाने शरणागती पत्करली. ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. १९.२ षटकात १२७ धावा करून ते ऑलआऊट झाले. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने ४१ चेंडूंचा सामना करताना ५९ धावा केल्या. त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. कर्णधार मिचेल मार्श १२ धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिस ११ धावा करून बाद झाला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला खातेही उघडता आले नाही. मॅथ्यू वेड ५ धावा करून बाद झाला.
अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला चांगलेच त्रस्त केले. गुलाबदिन नायबने ४ षटकात फक्त २० धावा देत ४ बळी घेतले. नवीन-उल-हकने ४ षटकांत २० धावा देत ३ बळी घेतले. मोहम्मद नबीने १ षटकात फक्त १ धाव दिली आणि १ बळी घेतला. कर्णधार राशिद खानलाही १ विकेट मिळाला. ओमरझाईनेही एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियन संघ ७ वेळचा विश्वविजेता आहे. २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाने T20 विश्वचषक जिंकला होता. त्यांनी ६ वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने १९८७, १९९९, २००३, २००७, २०१५ आणि २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
संबंधित बातम्या