T20 world cup semi final : टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात वेस्ट इंडिजच्या वेळेनुसार २६ जून रोजी रात्री ८.३० ते २७ जून रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजेपर्यंत खेळवला जाईल. हा सामना त्रिनिदादमध्ये होणार आहे. या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी टी-२० विश्वचषकात उद्या एक इतिहास घडणार आहे. त्याला कारणंही तशीच आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेनं अफगाणिस्तान हा क्रिकेट विश्वात खूपच नवखा संघ आहे. या संघानं यावेळचा टी-२० विश्वचषक गाजवला आहे. बांगलादेशला हरवून आणि ऑस्ट्रेलियाला धक्का देत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या संघाची सेमीफायनलमधील एन्ट्री ही देखील इतिहास घडवणारी ठरणार आहे. कारण पहिल्यांदाच अफगाणिस्तान विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. हा सामना जिंकल्यास पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचण्याची संधीही या संघाला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ जुना आणि अनुभवी असली तरी अद्याप या संघाला कधीही टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळं उद्याची सेमीफायनल या संघासाठी देखील ऐतिहासिक ठरणार आहे.
प्रत्येक वेळी नॉकआऊट सामन्यांमध्ये पराभव होत असल्यामुळं दक्षिण आफ्रिका संघावर चोकर्सचा शिक्का लागला आहे. हा चोकर्सचा शिक्का पुसण्याची संधी यावेळी दक्षिण आफ्रिकेला आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेनं जिंकल्यास पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा मान संघाला मिळणार आहे. या सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांनी सुपर ८ फेरीत उत्तम कामगिरी केली आहे. अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशला पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. तर, दक्षिण आफ्रिकेनं त्यांच्या गटातील तिन्ही संघांना पराभूत केलं आहे. मात्र, अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं वेस्ट इंडिजविरुद्ध कसाबसा विजय मिळवला. त्या सामन्यात संघाचा पराभव झाला असता, तर संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला असता. त्यामुळं उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका अधिक सावधपणे खेळण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या