टी-क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकारांना खूप महत्त्व आहे. विशेषत: षटकार मारणाऱ्या फलंदाजांना खूप टाळ्या आणि लोकप्रियता मिळते. अशा परिस्थितीत षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंची अनेकदा चर्चा होते. वाटेल तेव्हा षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, ख्रिस गेल, विव्ह रिचर्ड्स, मॅथ्यू हेडन, एबी डिव्हिलियर्स, एमएस धोनी, किरॉन पोलार्ड, हेनरिक क्लासेन, संजू सॅमसन यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
या खेळाडूंमध्ये एक गोष्ट सारखी आहे, ती म्हणजे या खेळाडूंची शरीरयष्टी खूप मजबूत आहे. यामुळे हे फलंदाज अगदी सहज षटकार मारू शकतात.
पण सध्याच्या क्रिकेटच्या युगात असेही काही फलंदाज आहेत जे, शरीराने अगदी सडपातळ दिसतात. पण खूप लांबवर आणि सहज षटकार मारतात. अशाच काही खेळाडूंबाबत आपण येथे जाणून घेणार आहोत.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दिसायला सडपातळ आहे. तो त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच मुंबई इंडियन्सकडून खेळतो. या काळात त्याने खळबळ उडवून दिली होती. तेव्हापासून सडपातळ दिसणारा खेळाडू लांबलचक षटकार कसा मारतो हे पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
पंड्या आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९० ते १०० मीटर लांब षटकार सहज मारतो. हार्दिकने आपल्या टी-20 कारकिर्दीतील २५१ डावांमध्ये २८६ षटकार मारले आहेत. तसेच, त्याने ६१ एकदिवसीय डावात ६७ षटकार मारले आहेत.
सध्या टीम इंडियाचा युवा फलंदाज अभिषेक शर्माचे नाव सर्वांच्या ओठावर आहे. त्याने मुंबईत इंग्लंडविरुद्ध अवघ्या ५४ चेंडूत १३५ धावांची स्फोटक खेळी केली होती. या खेळीचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचे १३ षटकार. पहिल्यांदाच एखाद्या भारतीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात एवढे षटकार मारले आहेत.
आता अभिषेकची बॉडी पाहून हा फलंदाज अशी स्फोटक फलंदाजी करू शकतो यावर विश्वास बसणार नाही. खुद्द अभिषेकनेही एका मुलाखतीत सांगितले होते की, लोक त्याला हाच प्रश्न विचारतात. मात्र अवघ्या १२९ टी-20 सामन्यांमध्ये २१५ षटकार ठोकणारा अभिषेक हा समज चुकीचा सिद्ध करत आहे.
अभिषेक शर्माप्रमाणेच भारताचा युवा सलामीवीर यशस्वीनेही आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहेत. जैस्वालची उंची सुमारे ६ फूट असली तरी तो खूपच सडपातळ दिसतो. त्याची बॉडी पाहून कोणीही म्हणणार नाही, की तो एवढे लांब षटकार सहज मारतो.
पण २०२४ या वर्षात जैस्वालने एकट्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३६ षटकार मारून विश्वविक्रम केला होता. जैस्वालने केवळ १०० टी20 डावांमध्ये १२७ षटकार मारले आहेत, तर ६६ प्रथम श्रेणी डावांमध्ये ६३ षटकार मारले आहेत.
सध्याच्या युगातील सर्वात स्फोटक फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर त्यात वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनचे नाव नक्कीच येते. सर्वात क्लीन षटकार मारण्यासाठी निकोलस पुरन प्रसिद्ध आहे. ताकदवान खेळाडूंनी भरलेल्या विंडीज संघात निकोलस पूरन सर्वात सडपातळ खेळाडू आहे.
मात्र ३५७ टी-20 डावांमध्ये त्याने ५९८ षटकार ठोकले आहेत. त्याच्या नावावर ९७ एकदिवसीय डावात १४९ षटकार आहेत. पूरनने मारलेले षटकार अनेकदा खूप उंच आणि लांब असतात, जे कधीकधी स्टेडियमच्या बाहेर जाऊन पडतात.
संबंधित बातम्या