इराणी कप २०२४ चा सामना रणजी विजेता मुंबई आणि शेष भारत यांच्यात होत आहे. लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात शेष भारताचा सलामीवीर अभिमन्यू अभिमन्यू ईस्वरन याने आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (३ ऑक्टोबर) शानदार शतक झळकावले आहे.
सामन्याच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने सरफराज खानच्या द्विशतकाच्या जोरावर ५३७ धावा केल्या होत्या.
बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अभिमन्यू ईश्वरन याने सलग तिसऱ्या प्रथम श्रेणी सामन्यात शतक झळकावले आहे. त्याने ११७ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. यापूर्वी दुलीप ट्रॉफीमध्ये भारत ब संघाचे कर्णधार असताना ईश्वरनने सलग दोन शतके झळकावली होती.
रणजी ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात त्याने द्विशतक झळकावले होते. अशाप्रकारे त्याचे हे सलग ५ सामन्यातील चौथे शतक आहे.
२९ वर्षीय अभिमन्यू ईश्वरन याने अद्याप टीम इंडियासाठी पदार्पण केलेले नाही. गेल्या काही वर्षांत त्याला अनेकदा भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले आहे. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
पदार्पण न करताच त्याला वगळण्यात आले आहे. त्याच्या पाठोपाठ आलेल्या यशस्वी जैस्वालने पदार्पण करून आपली जागा पक्की केली पण ईश्वरन अजूनही वाट पाहत आहे. ६ सप्टेंबर १९९५ ला जन्मलेला इस्वरन आपला ९८ वा प्रथम श्रेणी सामना खेळत असून त्याचे हे २६ वे शतक आहे. तो भारत अ संघाचा कर्णधार आहे.
या सामन्यात मुंबईचा पहिला डाव तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ५३७ धावांवर आटोपला. युवा फलंदाज सरफराज खानने संघासाठी २२२ धावांची नाबाद खेळी केली. सरफराजने २८६ चेंडूत २५ चौकार आणि ४ षटकार मारले. कर्णधार अजिंक्य रहाणेचे शतक हुकले आणि तो ९७ धावा करून बाद झाला. तनुष कोटियन आणि श्रेयस अय्यर यांनीही अर्धशतके झळकावली. जर हा सामना अनिर्णित राहिला तर पहिल्या डावात आघाडी घेणारा संघ विजेता ठरेल.
दरम्यान, ९८ प्रथम श्रेणी सामने खेळून आणि अनेक शतकं द्विशतकं करूनही अभिमन्यू इस्वरनला अद्याप टीम इंडियात जागा मिळाली नाही. त्याच्या मागून येऊन अनेक युवा खेळाडूंनी टीम इंडियात जागा निश्चित केली. यात शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांचाही समावेश आहे. पण इस्वरनला टीम इंडियाचे तिकिट मिळाले नाही.
इस्वरनसारखे उदाहरण भुतकाळातही घडले आहे. मुंबई रणजी संगाचा माजी कर्णधार अमोल मजुमदार याच्यासोबतबी असेच घडले होते. १०० हून अधिक प्रथम श्रेणी सामने खेळून आणि शतके द्विशतके करूनदेखील त्याला टीम इंडियात जागा मिळाली नव्हती.
अमोल मुझुमदार हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात दुर्दैवी क्रिकेटर मानला जातो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा करूनही त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. ११ नोव्हेंबर १९७४ रोजी मुंबईत जन्मलेला अमोल मजुमदार १९९४ मध्ये भारतीय अंडर-१९ संघाचे सदस्य होता.
भारत अ संघात सौरव गांगुली आणि राहुल द्रविड सारख्या दिग्गजांसह तो खेळला आहे. २००६-०७ मध्ये त्याला मुंबई संघाचे कर्णधारपद देण्यात आले. अमोल मजुमदारने १७१ प्रथम श्रेणी सामन्यांच्या २६० डावात ११ हजार १६७ धावा केल्या. तसेच ६० अर्धशतके आणि ३० शतके झळकावली.