आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात पंजाब किंग्स सर्वात जास्त पैसे घेऊन आले होते. त्यांच्या पर्समध्ये ११० कोटी शिल्लक होते. कारण लिलावाआधी पंजाबने केवळ दोनच खेळाडूंना रिटेन केले होते. यानंतर मेगा लिलावात पंजाबने आपला संघ पूर्ण करण्यासाठी १०९.६५ कोटी रुपये खर्च केले. पण तरीही पंजाब किंग्जने मोठी चूक केल्याचे क्रिकेट तज्ज्ञ सांगत आहेत.
वास्तविक, पंजाब किंग्स संघाच्या सलामीच्या जोडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने संघाच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पंजाब किंग्जसाठी देशांतर्गत खेळाडूंवर अवलंबून राहणे धोक्याचे ठरू शकते, असे त्याचे मत आहे.
आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, "पंजाब किंग्सने लिलावात ११० कोटी रुपयांच्या पर्ससह भाग घेतला, परंतु त्यांनी अनकॅप्ड सलामीवीरांवर बोली लावली. ही रणनीती धोकादायक ठरू शकते. एवढ्या पैशांत जोस बटलर, इशान किशन किंवा प्रसिद्ध खेळाडू जसे फिल सॉल्ट विकत घेता आले असते."
पंजाब किंग्सने प्रभसिमरन सिंगला ४ कोटी रुपयांना रिटेन केले, तर डोमेस्टिक क्रिकेटचा उगवता स्टार प्रियांश आर्यला ३.८० कोटी रुपयांना विकत घेतले. हे दोन्ही खेळाडू अनकॅप्ड आहेत.
ओपनिंगसाठी पंजाब किंग्ज ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसला आजमावू शकतो, अशी शक्यता आकाश चोप्राने व्यक्त केली. तो म्हणाला, स्टॉइनिस ओपन करू शकतो आणि रिकी पाँटिंगच्या पुनरागमनानंतर ते शक्य आहे.
याशिवाय त्याने यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिसचेही नाव सुचवले. पण, चोप्राच्या मते इंग्लिश खेळामुळे संघाचा समतोल बिघडू शकतो. तो म्हणाला, "इंग्लिस ओपन केल्यास दोन परदेशी वेगवान गोलंदाजांचा समावेश करणे कठीण होईल."
पंजाब किंग्जकडे आधीपासूनच ग्लेन मॅक्सवेल आणि स्टॉइनिससारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. अशा स्थितीत सलामीची जोडी निवडल्याने संघाच्या संतुलनावर परिणाम होऊ शकतो. त्यांनी कोणत्या कॉम्बिनेशनसोबत जायचे हे ठरवणे संघ व्यवस्थापनासमोर आव्हान असेल.
संबंधित बातम्या