आकाश चोप्रा याला भारतासाठी केवळ १० कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. परंतु त्याची लोकप्रियता खूप आहे. विशेष म्हणजे, त्याला ही लोकप्रियता क्रिकेटपटू म्हणून नाही तर कॉमेंटेटर म्हणून मिळाली आहे.
म्हणजेच, तो क्रिकेटपटू म्हणून नाही तर समालोचक म्हणून अधिक ओळखला जातो. आकाश चोप्रा याला लोक त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी नव्हे तर स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंगसाठी अधिक ओळखतात. दिल्लीचा माजी क्लासिकल सलामीवीर आणि मजबूत टेक्निकचा धनी आकाश चोप्रा याचा आज (१९ सप्टेंबर) वाढदिवस आहे.
१९ सप्टेंबर १९७७ रोजी जन्मलेला आकाश चोप्रा आज ४७ वर्षांचा झाला आहे. अत्यंत प्रतिभावान असूनही आकाशला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी फारसे सामने खेळता आले नाहीत. पण आपल्या मेहनती आणि खास समालोचनाच्या जोरावर त्याने आज एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आज आकाश चोप्राकडे त्याच्या पात्रतेचे सर्व काही आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, आकाशची एकूण संपत्ती अंदाजे ८ मिलियन डॉलर्स आहे, जी भारतीय चलनात सुमारे ६४ कोटी रुपये होते.
आकाशने ही संपत्ती त्याच्या क्रिकेट कॉमेंट्री, यूट्यूब चॅनल, बँड एंडोर्समेंट आणि गुंतवणुकीतून मिळवली आहे. अलीकडेच एका यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत आकाश चोप्राने भारतातील कॉमेंटेटर्सना मिळणाऱ्या पगाराबद्दल खुलेपणाने सांगितले होते.
या मुलाखतीत आकाश चोप्राला क्रिकेट समालोचकांच्या मानधनाबद्दल विचारण्यात आले होते, ज्यात आकाश चोप्रा म्हणाला, 'मी चुकीचे असू शकतो, कारण आजपर्यंत मी कोणत्याही कॉमेंटेटरला त्याचा पगार विचारला नाही, परंतु युवा/नवख्या कॉमेंटेटरची फी किमान ते ३५ ते ४० हजार रुपयांपर्यंत असू शकते.
तर अनुभवी समालोचक प्रत्येक सामन्यात ६-१० लाख रुपये कमवू शकतो. जर एका वर्षात १०० सामने मिळत असतील तर अनुभवी क्रिकेट समालोचक वर्षाला १० कोटी रुपये कमवू शकतो.