दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये युवा फलंदाज मुशीर खान याने अप्रतिम कामगिरी केली आहे. मुशीर खानने पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले आहे. फलंदाजीसाठी अवघड असलेल्या पीचवर त्याने २०५ चेंडूत शतक झळकावले. यानंतर तो हे वृत्त लिहिपर्यंत ३२० चेंडूत १६० धावांवर फलंदाजी करत आहे.
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत अ आणि भारत ब यांच्यात सामना खेळला जात आहे.
या सामन्यात भारत ब संघाच्या मधल्या फळीतील एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. मुशीरचा भाऊ सरफराज खान ९ धावा करून बाद झाला तर ऋषभ पंत ७ धावा करून बाद झाला. नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांचे खातेही उघडले नाही.
मुशीरची फर्स्ट क्लास कारकीर्द फक्त ७ सामन्यांची आहे, पण त्याने आपण लंबी रेस का घोडा असल्याचे दाखवून दिले आहे. अशा स्थितीत मुशीर खान लवकरच टीम इंडियात एन्ट्री करू शकतो. मुशीर एवढ्या लवकर टीम इंडियात कसा काय दाखल होऊ शकतो, याची काही कारणं आपण येथे जाणून घेणार आहोत.
मुशीर खान फिरकी आणि वेगवान गोलंदाजीच्या विरोधात खूप मजबूत आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये त्याने खलील अहम, आवेश खान आणि आकाश दीप या आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. कुलदीप यादवविरुद्धही त्याने सहज धावा केल्या. क्रिझमधून बाहेर येऊन स्पिन खेळण्याची क्षमताही त्याच्यात आहे.
मुशीर खानमध्ये मोठी इनिंग खेळण्याची क्षमता आहे. एकदा सेट झाल्यावर त्याला बाद करणे सोपे नाही. त्याने ६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एक अर्धशतक आणि ३ शतके झळकावली आहेत. यात द्विशतकाचाही समावेश आहे.
एक काळ असा होता की भारतीय संघातील प्रत्येक फलंदाज गोलंदाजी करत असे. सचिन, सेहवाग, गांगुली, युवराज यापैकी कोणीही १० षटके टाकू शकत होते. पण आता भारतीय संघात अशा खेळाडूंची उणीव आहे. अशा स्थितीत मुशीर खान फलंदाजीसोबतच एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज देखील आहे. अंडर-१९ वर्ल्डकपमध्येही त्याने ७ विकेट घेतल्या होत्या.
आत्तापर्यंत मुशीरला देशांतर्गत क्रिकेटमध्ये फक्त प्रथम श्रेणी खेळण्याची संधी मिळाली आहे. मात्र, अंडर-१९ विश्वचषकात त्याने दाखवून दिले की तो वेगाने धावाही करू शकतो. त्याच्याकडे अनेक शॉट्स आहेत.
रणजी ट्रॉफीच्या गेल्या मोसमात मुशीरने उपांत्यपूर्व फेरीत मुंबईसाठी २०३ धावांची इनिंग खेळली होती. त्यांच्या संघाने एकूण ३८४ धावा केल्या होत्या. अंतिम सामन्याच्या दुसऱ्या डावात मुशीरने ३२६ चेंडूत १३६ धावांची खेळी केली.