आयपीएल २०२५ पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्याआधी बीसीसीआयने खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी नियम जारी केले आहेत. प्रत्येक फ्रँचायझी जास्तीत जास्त ६ खेळाडू रिटेन करू शकते. यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले जास्तीत जास्त ५ खेळाडू रिटेन होऊ शकतात.
तर ५ खेळाडूंमध्ये कितीही भारतीय किंवा परदेशी नावे असू शकतात. याशिवाय जास्तीत जास्त दोन अनकॅप्ड खेळाडूंनाही कायम ठेवता येईल. फ्रँचायझीने ५ खेळाडू कायम ठेवल्यास त्यांना एक RTM मिळेल.
अशा स्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कोणत्या खेळाडूंना रिटेन करू शकते, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून विराट कोहली आरसीबीकडून खेळत आहे. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये एकाच संघात राहणारा तो लीग इतिहासातील एकमेव खेळाडू आहे. विराट पुन्हा एकदा आरसीबीचा भाग होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तो संघाचा पहिला रिटेन्शन असू शकतो.
फ्रँचायझी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजलाही कायम ठेवू शकते. सिराज हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा भाग आहे. नवीन चेंडू तसेच डेथ ओव्हर्समध्ये अप्रतिम गोलंदाजी करू शकतो. अशा परिस्थितीत फ्रँचायझी त्याला लिलावाच्या टेबलावर पाठवू इच्छित नाही.
स्फोटक इंग्लिश फलंदाज विल जॅकने IPL २०२४ मध्ये शतक झळकावले होते. याशिवाय गोलंदाजीतही त्याने दोन बळी घेतले. जॅक आपल्या बॅटने सामन्याचा मार्ग बदलू शकतो. यामुळेच आरसीबी त्याला आपल्यासोबत ठेवू शकते.
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीन देखील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत राहू शकतो. आयपीएलच्या शेवटच्या मोसमात मुंबईतून ट्रेड करून तो आरसीबीत पोहोचला. ग्लेन मॅक्सवेलला रिलीज करून, फ्रेंचायझी त्याला कायम ठेवू शकते.
रजत पाटीदार फिरकी तसेच वेगवान गोलंदाजी विरुद्ध चांगली फलंदाजी करतो. आयपीएलच्या २४ डावांमध्ये त्याने ३५ च्या सरासरीने आणि १५९ च्या स्ट्राईक रेटने ७९९ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ५१ चौकार आणि ५४ षटकार आहेत. अशा स्थितीत त्याचे संघात राहणेही निश्चित मानले जात आहे.