Full list of sold and unsold players in IPL Auction 2025:आयपीएल २०२५ साठीच्या मेगा लिलावात खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होत आहे. लखनौ सुपर जायंट्स (LSG) ने ऋषभ पंतला २७ कोटी रुपयांना खरेदी करून इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनवला आहे. त्याच्याशिवाय श्रेयस अय्यरवर २६.७५ कोटी रुपयांची बोली लागल्याने खळबळ उडाली आहे, त्याला पंजाब किंग्जने विकत घेतले आहे.
पण आत्तापर्यंत झाेल्या या मेगा लिलावात अशी काही नावे आहेत, ज्यांची खूप चर्चा होती. त्यांच्यावर २५ ते ३० कोटी रूपयांपंर्यंतची बोली लावली जाऊ शकते, असे बोलले जात होते.पण हे खेळाडू खूपच किरकोळ किंमतीत विकले गेले.
केएल राहुलला आयपीएल २०२४ नंतर लखनऊ सुपरजायंट्सने रिलीज केले. तो एक कर्णधार, यष्टीरक्षक आणि अव्वल दर्जाचा फलंदाज देखील आहे. इतके टॅलेंट पाहता त्याच्यासाठी किमान २०-२५ कोटींची बोली लागण्याची अपेक्षा होती. पण दिल्ली कॅपिटल्सने त्याला अवघ्या १४ कोटी रुपयांना खरेदी करून चांगली बचत केली.
ग्लेन मॅक्सवेल २०२० पासून आरसीबीकडून खेळत होता आणि गेल्या मोसमात खेळण्यासाठी त्याला ११ कोटी रुपये मानधन मिळाले. पण यावेळी पंजाब किंग्सने त्याला अवघ्या ४.२० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. मॅक्सवेल शेवटचा २०१७ मध्ये पंजाबकडून खेळताना दिसला होता.
रचिन रवींद्रने मागील हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. गेल्या मोसमात त्याने सीएसकेसाठी १० सामन्यांत २२२ धावा केल्या होत्या. १६० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता, तसेच, नुकत्याच भारतात झालेल्या कसोटी मालिकेत त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रवींद्रच्या वाढत्या उंचीचा विचार करता, ४ कोटींची रक्कम खूपच कमी आहे.
एडन मार्कराम हा सध्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार आहे. त्याला लखनऊ सुपर जायंट्सने त्याच्या मूळ किंमती म्हणजेच २ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. मार्करामने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपदही भूषवले आहे. असे असतानाही त्यावर दोन कोटींपेक्षा जास्त बोली कोणत्याच संघाने लावली नाही.
मिचेल मार्श फलंदाजीत मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि गोलंदाजीतही चांगली कामगिरी करतो. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ६६६ धावा आणि ३७ विकेट्स घेतल्या आहेत. मागील हंगामात खेळण्यासाठी दिल्लीने त्याला ६.५० कोटी रुपये मानधन दिले होते, परंतु यावेळी लखनऊने त्याला ३.४० कोटी रुपये देऊन स्वस्तात खरेदी केले.