team india for T20 Series Vs Aus : क्रिकेट वर्ल्डकप संपला आहे. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेला २३ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची सोमवारी संध्याकाळी घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आले आहे.
मात्र, या मालिकेसाठी काही खेळाडूंची निवड झाली नाही, यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. मात्र निवड समितीने या खेळाडूंचा विचार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी केला नाही.
ऑस्ट्रेलिाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संजू सॅमसन सर्वात मोठा दावेदार होता. पण तो संघात का स्थान मिळवू शकला नाही हे कदाचित कोणालाच माहीत नसेल. त्याने २०१५ मध्ये भारतासाठी पदार्पण केले होते. पण आत्तापर्यंत फक्त २४ टी-20 खेळण्याची संधी मिळाली आहे. तो सातत्याने संघातून आत -बाहेर होत असतो. संजूने चांगली कामगिरी केली तरी त्याला सतत वगळले जाते.
पंजाबचा अभिषेक शर्मा हा टॉप ऑर्डरचा फलंदाज असण्यासोबतच एक चांगला फिरकी गोलंदाज आहे. भारतीय संघाला अशा खेळाडूची गरज आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने २ शतकांच्या मदतीने ४८५ धावा केल्या होत्या. पण अशा कामगिनंतरही त्याला संधी मिळाली नाही.
आयपीएलमधील अपयशामुळे सतत ट्रोल झालेल्या रियान परागचा देशांतर्गत हंगाम चांगला गेला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने सलग ४ अर्धशतके झळकावली. गोलंदाजीतही ११ बळी घेतले. त्याआधी तो देवधर करंडक स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टूर्नामेंटही होता. संघात त्याच्या समावेशाची चर्चा होती मात्र निवडकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार गेल्या एक वर्षापासून भारतीय संघाबाहेर आहे. त्याने मुश्ताक अली ट्रॉफीच्या ७ सामन्यात १६ विकेट घेतल्या. यानंतर भारतीय संघात पुनरागमन होईल असे वाटत होते. पण आता निवडकर्त्यांनी त्याच्या पलीकडे बघायला सुरुवात केली आहे. भुवी सध्यातरी भारताकडून खेळताना दिसत नाही.
युजवेंद्र चहल हा भारताचा टी-२० मधील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. उत्कृष्ट रेकॉर्ड असूनही त्याला संघातून वगळण्यात आले. याआधी चहलला विश्वचषक संघातही संधी मिळाली नव्हती. विश्वचषकापूर्वी त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यात टी-20 मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याने चांगली गोलंदाजी केली होती.