मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG : इंग्लंड कसोटी मालिकेत कोहलीची जागा कोण घेणार? या चार फलंदाजांची सर्वाधिक चर्चा

IND vs ENG : इंग्लंड कसोटी मालिकेत कोहलीची जागा कोण घेणार? या चार फलंदाजांची सर्वाधिक चर्चा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 22, 2024 08:45 PM IST

Ind Vs Eng Test Series : विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले आहे. यानंतर आता कोहलीचे बदली खेळाडू कोण असतील, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Ind Vs Eng Test Series
Ind Vs Eng Test Series (PTI)

india vs england test series : भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाने तयारीसुद्धा सुरू केली आहे. पण आता टीम इंडियाचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर झाला आहे.

विराट कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले आहे.

दरम्यान, विराट बाहेर पडल्यानंतर लवकरच त्याच्या बदली खेळाडूची घोषणा होऊ शकते. आता विराटची जागा कोण घेऊ शकतो, अशा खेळाडूंबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. विराटची जागा घेण्याच्या शर्यतीत ४ खेळाडू आहेत.

चेतेश्वर पुजारा

अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा संघात पुनरागमन करू शकतो. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी तो विराट कोहलीची जागा घेऊ शकतो. पुजारा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने अलीकडेच रणजी ट्रॉफीमध्ये झारखंडविरुद्ध द्विशतक झळकावले होते. त्याने ३० चौकारांसह २४३ धावांची नाबाद खेळी खेळली होती. एवढेच नाही तर त्याने नुकतेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये  २० हजार धावा पूर्ण केल्या.

अभिमन्यू इस्वरन

२८ वर्षीय अभिमन्यू इसवरनची अनेकदा संघात निवड होते, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही. आता विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याला संधी दिली जाऊ शकते. त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटचा खूप अनुभव आहे. अभिमन्यूने आतापर्यंत ९० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४६.४० च्या सरासरीने ६५८९ धावा केल्या आहेत. त्याने २२ शतके आणि २६ अर्धशतके झळकावली आहेत.

सरफराज खान

मुंबईच्या २६ वर्षीय सरफराज खानने देशांतर्गत रेड बॉल क्रिकेटमध्ये स्वत:ला चांगले सिद्ध केले आहे. तो बऱ्याच दिवसांपासून भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, आता विराट कोहलीच्या जागी त्याला संधी मिळू शकते. त्याने ४४ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये ६८.२० च्या सरासरीने ३७५१ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत १३ शतके आणि ११ अर्धशतके केली आहेत.

रजत पाटीदार

आयपीएलमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रजत पाटीदारने देशांतर्गत क्रिकेटमध्येही नाव कमावले आहे. रेड बॉल क्रिकेटमध्ये त्याने आपल्या कामगिरीने प्रभावित केले आहे. इतकेच नाही तर भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात नुकत्याच झालेल्या सामन्यात रजतने अप्रतिम फलंदाजी केली. पहिल्या डावात त्याने १५८ चेंडूत १५१ धावांची जबरदस्त खेळी केली होती.

WhatsApp channel