आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित झाला आहे. आत्तापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एका षटकात जास्तीत जास्त ३६ धावा झाल्या होत्या. आता हा आकडा ३९ धावांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय T20 च्या एका षटकात ३९ धावा... हे 'अशक्य' वाटत असले तरी ते 'शक्य' झाले आहे.
हा पराक्रम पुरुषांच्या ICC पुरुष T20 विश्वचषक उप-प्रादेशिक पूर्व आशिया-पॅसिफिक क्वालिफायर-ए २०२४ या स्पर्धेमध्ये घडला, जिथे सामोआचा फलंदाज डॅरियस व्हिसरने एका षटकात ६ षटकारांसह एकूण ३९ धावा केल्या.
डावाच्या १५व्या षटकात ३९ धावा काढण्याचा पराक्रम डॅरियस व्हिसरने केला. डॅरियसने एकूण ६ षटकार ठोकले, तर उर्वरित ३ धावा नो बॉलमधून आल्या. अशा प्रकारे १ षटकात ३९ धावा करण्याचा पराक्रम झाला.
क्वालिफायर-ए सामन्याच्या १५व्या षटकात, व्हिसरने ६ गगनचुंबी षटकार ठोकले आणि वानुआतुचा वेगवान गोलंदाज नलिन निपिकोच्या तीन नो-बॉल्सनेही त्याला मदत केली. त्याने २००७ मधील पहिल्या ICC T20 विश्वचषकात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ६ षटकार मारण्याचा भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा पराक्रम मागे टाकला.
किरॉन पोलार्ड (२०२१ - ३६ धावा), निकोलस पूरन (२०२४ - ३६ धावा), दीपेंद्र सिंग ऐरी (२०२४ -३६ धावा) देखील मागे पडले आहेत.
ओव्हरच्या पहिल्या ३ चेंडूंवर डॅरियस व्हिसरने वानुआटूच्या निपिकोवर सलग ३ षटकार ठोकले. त्यानंतर चौथा चेंडू नो बॉल होता, परिणामी १ धाव झाली. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर डॅरियसने आणखी १ षटकार ठोकला. त्यानंतर ओव्हरचा पाचवा चेंडू डॉट होता. यानंतर सहावा चेंडू नो बॉल होता, ज्यावर एक धाव आली. पुढचा चेंडू पुन्हा नो बॉल होता, ज्यावर षटकार मारला गेला आणि शेवटच्या फ्री हिट बॉलवर षटकारही आला. अशा प्रकारे एका षटकात ३९ धावा करणे आश्चर्यकारक होते.
डॅरियस व्हिसर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला सामोआ खेळाडू ठरला. व्हिसरने त्याच्या डावात १४ षटकार मारले, जे पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एका फलंदाजाने मारलेल्या सर्वाधिक षटकारांपेक्षा ४ कमी होते. त्याने ६२ चेंडूंच्या खेळीत १३२ धावा करत सामोआला दुसरा विजय मिळवून दिला. या विजयामुळे २०२६ मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी पात्र होण्याच्या त्यांच्या आशा जिवंत राहिल्या आहेत.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सामोआ संघ २० षटकात १७४ धावांवर सर्वबाद झाला. डॅरियस व्हिसरने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि ६२ चेंडूत ५ चौकार आणि १४ षटकारांच्या मदतीने १३२ धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना वानुआटू संघ २० षटकात ९ बाद १६४ धावाच करू शकला.