रणजी ट्रॉफीमध्ये मोठा विक्रम घडला आहे. गोव्याच्या स्नेहल कौठणकर आणि कश्यप बाकले या फलंदाजांनी अरुणाचल प्रदेशविरुद्ध इतिहास रचला. गोव्याच्या या दोन फलंदाजांनी एकाच डावात त्रिशतकं ठोकली आहेत. कश्यप बकले ३०० धावा करून नाबाद परतला. तर स्नेहल कौठणकरने नाबाद ३१४ धावा केल्या. दोन्ही खेळाडूंमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ६०६ धावांची विक्रमी भागीदारी झाली.
रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी भागीदारी आहे. त्याचबरोबर या विक्रमी भागीदारीमुळे गोव्याने पहिल्या डावात २ बाद ७२७ धावा केल्या.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गोव्याची सुरुवात चांगली झाली नाही. गोव्याचे सलामीवीर इशान गाडेकर आणि सुयश प्रभुदेसाई हे लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले.
इशान गाडेकर आणि सुयश प्रभुदेसाई लवकर बाद झाले, पण त्यानंतर स्नेहल कौठणकर आणि कश्यप बाकले यांनी डावाची सुत्रे हाती घेतली. या फलंदाजांनी अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांविरुद्ध सहज धावा केल्या. कश्यप बकलेने २६९ चेंडूत ३०० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ३९ चौकार आणि २ षटकार मारले. तर स्नेहल कौठणकर याने २१५ चेंडूत ३१४ धावा केल्या. या फलंदाजाने आपल्या खेळीत ४५ चौकार आणि ४ षटकार मारले. या दोन फलंदाजांच्या विक्रमी भागीदारीनंतर गोव्याने पहिला डाव २ बाद ७२७ धावांवर घोषित केला.
गोव्याने पहिल्या डावात केलेल्या ७२७ धावांना प्रत्युत्तर देताना अरुणाचल प्रदेशचा पहिला डाव अवघ्या ८४ धावांवर आटोपला. अशा प्रकारे गोव्याला पहिल्या डावाच्या जोरावर मोठी आघाडी मिळाली. यानंतर गोव्याने अरुणाचल प्रदेशला फॉलोऑन खेळण्यासाठी पाचारण केले. त्याचवेळी, आता बातमी लिहिपर्यंत अरुणाचल प्रदेशची धावसंख्या दुसऱ्या डावात ७ बाद ७१ धावा आहे. पहिल्या डावाच्या आधारे अरुणाचल प्रदेश सध्या गोव्यापासून ५७२ धावा दूर आहे.