Zimbabwe vs Afghanistan : अफगाणिस्तानने जागतिक क्रिकेटला अनेक तगडे फिरकी गोलंदाज दिले आहेत. राशिद खान याच्यानंतर अफगाणिस्तानमधून मुजीबुर रहमान आणि कैस अहमदसारखे गोलंदाज आले आहेत. आता आणखी एक १८ वर्षांचा गोलंदाज क्रिकेट विश्वात धुमाकूळ घालत आहे.
अल्लाह गझनफर असे या फिरकीपटूचे नाव आहे. सध्या अफगाणिस्तानचा संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत गझनफरने अप्रतिम गोलंदाजी केली.
मिस्ट्री ऑफ स्पिनर अल्लाह गझनफरने झिम्बाब्वेच्या ५ फलंदाजांना बाद केले. तो तिसरा गोलंदाज म्हणून गोलंदाजी करायला आला. तो येताच त्याने पहिल्याच षटकात जॉयलॉर्ड गुम्बीला बाद केले. यानंतर बेन कुरन १२ धावा करून LBW झाला. दुसऱ्या स्पेलमध्ये गझनफरने यष्टिरक्षक तदिवनाशे मारुमणीला खाते उघडू दिले नाही. पुढच्याच चेंडूवर त्याने वेलिंग्टन मसाकादजा यालाही बाद केले.
अल्लाह गझनफरने न्यूमन न्यामहुरीला बाद करत आपल्या ५ बळी पूर्ण केले. त्याने १० षटकात ३३ धावा देत ५ बळी घेतले. यामुळे झिम्बाब्वेचा डाव १२७ धावांवर आटोपला. गझनफरने आपला ११ वा सामना खेळत दुसऱ्या सामन्यात ५ विकेट घेतल्या.
त्याने ११ सामन्यात २१ फलंदाजांना बाद केले आहे. ऑफ-स्पिन गोलंदाजीसोबतच तो चेंडूला दुसरीकडे वळवतो, त्यामुळेच त्याच्याविरुद्ध फलंदाजी करणे सोपे नसते.
अल्लाह गझनफर आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. फ्रँचायझीने अफगाणिस्तानच्या या गोलंदाजाला लिलावात ४.८० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. गेल्या मोसमात तो कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. मुजीब उर रहमानच्या जागी तो संघात आला पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. पण यावेळी तो मुंबईचा मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसू शकतो.
संबंधित बातम्या