वेस्ट इंडिजमध्ये सध्या कॅरेबियन प्रीमियर लीग २०२४ (CPL 2024) चा थरार सुरू आहे. या लीगमध्ये पाकिस्तानच्या एका गोलंदाजाची चांगलीच धुलाई झाली. या गोलंदाजाच्या वाईट गोलंदाजीमुळे त्याच्या संघाला जिंकलेला सामना गमवावा लागला. हा गोलंदाज दुसरा कोणी नसून दिग्गज मोहम्मद आमिर आहे.
मोहम्मद अमीरच्या षटकात विरोधी संघाने १६ धावा करून सामना जिंकला. CPL 2024 मध्ये शुक्रवारी अँटिग्वा अँड बारबुडा फाल्कन्स आणि गयाना ऍमेझॉन वॉरियर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात गयाना ॲमेझॉन वॉरियर्सला विजयासाठी शेवटच्या षटकात १६ धावांची गरज होती.
गयाना ॲमेझॉन वॉरियर्सचा फलंदाज ड्वेन प्रिटोरियसने आमिरच्या षटकात १८ धावा ठोकत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. आमिर केवळ शेवटच्या षटकात महागडा ठरला नाही तर डावाच्या १८व्या षटकातही आमिरने १८ धावा दिल्या. रोमॅरियो शेफर्डने १८ व्या षटकात आमिरची धुलाई केली. त्यानंतर २०व्या षटकात ड्वेन प्रिटोरियसने आमिरची धुलाई केली.
शेवटच्या षटकात काय घडलं?
गयाना ॲमेझॉन वॉरियर्सला शेवटच्या षटकात १६ धावांची गरज होती आणि ड्वेन प्रिटोरियस क्रीजवर उपस्थित होता. अँटिग्वा बारबुडा फाल्कन्सच्या कर्णधाराने मोहम्मद अमीरकडे चेंडू सोपवला. ओव्हरचा पहिला चेंडू डॉट बॉल होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर प्रिटोरियसने आमिरला चौकार मारला. यानंतर प्रिटोरियसने तिसऱ्या चेंडूवर आणखी एक चौकार मारला.
आता ३ चेंडूत ८ धावा हव्या होत्या. त्यानंतर आमिरने चौथा चेंडू डॉट बॉल टाकला. इथून पुन्हा उत्साह वाढला.
आता २ चेंडूत ८ धावा हव्या होत्या. प्रिटोरियसने पाचव्या चेंडूवर आमिरला चौकार मारून सामना जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. आता शेवटच्या चेंडूवर ४ धावा बाकी होत्या. आमिरने प्रिटोरियसला ऑफ-वाइड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही आणि प्रिटोरियसने या चेंडूवर षटकार मारून विजय मिळवला.