मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Zomato green : झोमॅटो बॉयच्या हिरव्या रंगाच्या पोषाखावरून मोठा वाद; कंपनीनं काही तासांतच निर्णय बदलला!

Zomato green : झोमॅटो बॉयच्या हिरव्या रंगाच्या पोषाखावरून मोठा वाद; कंपनीनं काही तासांतच निर्णय बदलला!

Mar 20, 2024 04:36 PM IST

Zomato Pure Veg Fleet : झोमॅटोच्या शाकाहारी ग्राहकांना सेवा देणाऱ्या डिलिव्हरी बॉयना हिरव्या रंंगाचा ड्रेस देण्याच्या कंपनीच्या निर्णयावरून वाद निर्माण झाल्यानंतर कंपनीनं आपला निर्णय मागे घेतला आहे.

झोमॅटो बॉयच्या नव्या हिरव्या रंगावरून मोठा वाद; कंपनीनं काही तासांतच निर्णय बदलला!
झोमॅटो बॉयच्या नव्या हिरव्या रंगावरून मोठा वाद; कंपनीनं काही तासांतच निर्णय बदलला!

Zomato green Row : शाकाहारी ग्राहकांना डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हिरव्या रंगाचा पोषाख देण्याचा निर्णय झोमॅटोनं काही तासांतच मागे घेतला आहे. झोमॅटोचे सर्व डिलिव्हरी बॉय पूर्वीप्रमाणे लाल पोषाखातच दिसतील, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. पोषाखातील बदलानंतर झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर कंपनीनं हा निर्णय घेतला आहे.

शाकाहारी ग्राहकांसाठी झोमॅटोनं 'प्युअर व्हेज मोड' सेवा सुरू केली होती. नव्या सेवेअंतर्गत शाकाहारी ग्राहकांना फूड डिलिव्हरी करणारे बॉयज हिरव्या रंगाचा पोषाख घालणार होते. या नव्या पोषाखातील फोटो स्वत: कंपनीचे सर्वेसर्वा दीपिंदर गोयल यांनी नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, या निर्णयावर जोरदार टीका झाली. त्यानंतर दोन वेगवेगळे पोषाख ठेवण्याचा निर्णय कंपनीनं मागे घेतला आहे. मात्र, शाकाहारी ग्राहकांना शुद्ध शाकाहारी फूड सर्व्हिस देणं सुरूच राहील, असंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काय म्हणाले दीपिंदर गोयल?

झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर निर्णयातील बदलाची माहिती दिली आहे. 'लाल आणि हिरव्या या दोन रंगांच्या ड्रेसचा वापर डिलिव्हरी पार्टर्नसमध्ये भेदभाव निर्माण करणारा आहे. ही गोष्ट आमच्या पटकन लक्षात आली नाही. हा भेद दूर करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आमचे व्हेज व नॉन-व्हेज सर्व डिलिव्हरी पार्टनर्स पूर्वीसारखे लाल ड्रेसमध्येच दिसतील, असं गोयल यांनी म्हटलं आहे.

ग्राहकांना ॲपवर व्हेज ऑर्डर पाहत येणार

जे ग्राहक 'प्युअर व्हेज' ऑर्डर निवडतील त्यांना मोबाईल ॲपवर त्याची माहिती मिळू शकेल. त्याच्या ऑर्डर फक्त व्हेजिटेरियन फ्लीटद्वारेच वितरीत केल्या जाणार आहेत आणि ते त्यांना कळू शकेल, असंही गोयल यांनी स्पष्ट केलं आहे.

कसा होऊ शकतो त्रास?

झोमॅटोच्या डिलिव्हरी पार्टनर्सचे पोषाख वेगवेगळे ठेवल्यास लाल पोषाख घालणाऱ्या डिलिव्हरी पार्टनर्सना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. एखादी सोसायटी किंवा परिसरात कपड्याच्या रंगांवरून संबंधित डिलिव्हरी पार्टनर मांसाहारी सेवा देतोय की शाकाहारी हे कळू शकणार आहे. तसं झाल्यास संबंधित ग्राहकांनाही हेटाळणीला सामोरं जावं लागू शकतं.

ग्राहकांच्या हिताबरोबरच डिलिव्हरी पार्टनर्सची सुरक्षा महत्त्वाची

‘आमच्या डिलिव्हरी पार्टनर्सची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आमचे काही ग्राहक त्यांच्या घरमालकांककडून अडचणीत येऊ शकतात. तसं झाल्यास ती आमची चूक ठरेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. प्युअर वेज सेवेच्या घोषणेनंतर हे मुद्दे उपस्थित केल्याबद्दल गोयल यांनी सोशल मीडियाचेही आभार मानले. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्या ऐकण्यात आम्हाला कमीपणा वाटत नाही. भविष्यातही आम्ही तुम्हाला उत्तम सेवा देत राहू,’ असं गोयल यांनी शेवटी म्हटलं आहे.

WhatsApp channel