Stock Market Updates : देशातील आघाडीची फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचा शेअर आज जोरदार चर्चेत आहे. हा शेअर आज ५ टक्क्यांनी घसरून २५१.६० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. ग्लोबल ब्रोकरेज फर्मनं दिलेलं खराब रेटिंग हे या घसरणीमागचं कारण आहे.
२०२४ मध्ये झोमॅटोच्या शेअरची किंमत दुपटीनं वाढल्यानं २०२५ मध्ये दिलासा मिळू शकतो, असा अंदाज जेफरीजच्या विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. जेफरीजनं झोमॅटोची टार्गेट प्राइस १८ टक्क्यांनी कमी करून २७५ रुपये केली आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजनं झोमॅटोचे शेअर्स 'होल्ड' कॉलवर आणले आहेत.
झोमॅटोचा शेअर आज सकाळच्या सत्रात ५ टक्क्यांनी घसरला. सकाळी ९.३२ वाजता एनएसईवर झोमॅटोचा शेअर २५४.९० रुपयांवर व्यवहार करत होता. आजच्या सत्रात झालेल्या घसरणीमुळं गेल्या महिन्याभरात या शेअरचं मूल्य सुमारे १६ टक्क्यांनी घसरलं आहे.
ब्रोकरेज कंपनीच्या मतानुसार, संभाव्या संधीच्या पार्श्वभूमीवर शेअरचं मूल्यांकन "जास्त खर्चिक नाही. मात्र, सध्याच्या कंपन्यांची आक्रमक रणनीती आणि नवीन स्पर्धकांच्या प्रवेशामुळं झोमॅटोच्या नजिकच्या नफ्यात घट होऊ शकते, असा इशारा ब्रोकरेजनं दिला आहे. ब्लिंकिट व्यतिरिक्त स्विगीची इन्स्टामार्ट, झेप्टो, अॅमेझॉन आदी स्पर्धक झटपट व्यावसायिक बाजारपेठेत हिस्सा मिळवण्यासाठी सक्रियपणे स्पर्धा करत आहेत.
मॉर्गन स्टॅनलीनं झोमॅटोवर 'ओव्हरवेट' रेटिंग कायम ठेवली असून शेअरसाठी ३३५ रुपयांचं लक्ष्य मूल्य कायम ठेवलं आहे. ब्रोकरेजनं भारताच्या इंटरनेट क्षेत्रात झोमॅटोची पहिली पसंती म्हणून निवड केली. तीव्र स्पर्धा असली तरी झोमॅटोनं नफ्यावर लक्ष केंद्रित केल्यास आणि विकासाचा सुधारीत दृष्टिकोन ठेवल्यास कंपनी आर्थिक वर्ष २०१५-२७ मध्ये ३३ टक्के महसूल सीएजीआर देईल, असा विश्वास मॉर्गन स्टॅनलीनं व्यक्त केला आहे.