Q3 Results : झोमॅटोला झटका! निव्वळ नफ्यात तब्बल ५७ टक्क्यांची घट, गुंतवणूकदारांची पळापळ
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Q3 Results : झोमॅटोला झटका! निव्वळ नफ्यात तब्बल ५७ टक्क्यांची घट, गुंतवणूकदारांची पळापळ

Q3 Results : झोमॅटोला झटका! निव्वळ नफ्यात तब्बल ५७ टक्क्यांची घट, गुंतवणूकदारांची पळापळ

Jan 20, 2025 04:56 PM IST

Zomato Share Price : फूड डिलिव्हरी अ‍ॅप आणि हायपरलोकल क्विक कॉमर्स कंपनी झोमॅटोला डिसेंबर तिमाहीत मोठा झटका बसला आहे. कंपनीचं निव्वळ उत्पन्न तब्बल ५७ टक्क्यांनी घटलं आहे.

झोमॅटोला झटका! निव्वळ नफ्यात तब्बल ५७ टक्क्यांची घट, गुंतवणूकदारांची पळापळ
झोमॅटोला झटका! निव्वळ नफ्यात तब्बल ५७ टक्क्यांची घट, गुंतवणूकदारांची पळापळ

Zomato Share News Today : देशातील आघाडीची फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोला आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांनी धक्का दिला आहे. डिसेंबरअखेरच्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ५७.३ टक्क्यांनी घसरून ५९ कोटी रुपयांवर आला आहे. क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंकिटवरील ऑर्डर पूर्ण करण्यासाठी अधिक केंद्रे उघडण्यासाठी झालेल्या अतिरिक्त खर्चाचा हा परिणाम मानला जात आहे.

दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) यांच्या नेतृत्वाखालील फूड डिलिव्हरी आणि हायपरलोकल क्विक कॉमर्स कंपनीचं चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कामकाजातून मिळणारं उत्पन्न ६४.४ टक्क्यांनी वाढून ५,४०५ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या बीटूसी व्यवसायाचं ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू (GOV) ५७ टक्क्यांनी वाढून २०,२०६ कोटी रुपये झालं आहे.

कसे आहेत तिमाही निकाल?

फूड डिलिव्हरी उद्योगाचा महसूल तिसऱ्या तिमाहीत सुमारे २२ टक्क्यांनी वाढला, तर देशातील क्विक कॉमर्स क्षेत्रातील बाजारपेठेतील आघाडीची कंपनी ब्लिंकिटच्या महसुलात दुपटीनं वाढ झाली. परिचालन आघाडीवर झोमॅटोचे व्याज, कर, अवमूल्यन आणि अमोर्टायझेशन (एबिटडा) आधीचं उत्पन्न १६२ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत ५१ कोटी रुपये होतं.

झोमॅटोचा एकूण खर्च ५,५३३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तो ३,३८३ कोटी रुपये होता. झोमॅटोपेक्षा ब्लिंकिट वेगानं वाढत असली तरी त्याला प्रतिस्पर्धी स्विगीची इन्स्टामार्ट, स्टार्ट-अप झेप्टो आणि वॉलमार्ट समर्थित फ्लिपकार्ट आणि टाटा समूह समर्थित बिगबास्केट कडून तगडी स्पर्धा आहे. ब्लिंकिट सध्या तोट्यात असून या तिमाहीत त्याला १०३ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे.

ब्लिंकिट डिसेंबर २०२६ पर्यंत २००० स्टोअरचा टप्पा गाठेल, असं झोमॅटोनं म्हटलं होतं, मात्र ब्लिंकिटनं डिसेंबर २०२४ अखेरच्या तिमाहीत १००० स्टोअरचा टप्पा ओलांडला. त्यामुळं २००० स्टोअर्सचं लक्ष्य एक वर्ष आधी डिसेंबर २०२५ पर्यंतच गाठेल असं दिसत आहे. कंपनीचे ईबीआयटी (EBITDA) मार्जिन तीन टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते १.६ टक्के होतं.

शेअर गडगडला!

क्विक कॉमर्स सेगमेंटमध्ये सुमारे ४६ टक्के मार्केट शेअर असलेल्या झोमॅटोनं शहरी भागात ऑर्डर पाठवण्यासाठी 'डार्क स्टोअर्स' आणि गोदामांची संख्या वाढवण्यासाठी गुंतवणूक करताना सवलती आणि मोफत डिलिव्हरी वाढवली आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होताच सोमवारी बीएसईवर झोमॅटोचा शेअर ३.१४ टक्क्यांनी घसरून २४०.९५ रुपयांवर बंद झाला. 

काय म्हणतात एक्सपर्ट्स?

ब्रोकरेजच्या मते, झोमॅटो ही हायपरलोकल डिलिव्हरी स्पेसमधील सर्वात लवचिक कंपनी आहे. कठीण काळातून लवकरात लवकर बाहेर पडण्याची कंपनीची क्षमता आहे. जेएम फायनान्शिअल्सच्या तज्ज्ञांच्या मते, झोमॅटो ही देशातील एकमेव मोठी हायपरलोकल डिलिव्हरी कंपनी आहे जी टॉपलाइन ग्रोथशी तडजोड न करता फ्री कॅश फ्लो निर्माण करत आहे.

झोमॅटो ही क्विक कॉमर्समधील उदयोन्मुख स्पर्धात्मक धोक्यांचा सामना करण्यासाठी सर्वोत्तम स्थितीत आहे. त्यामुळंच जेएम फायनान्शिअल्सच्या विश्लेषकांनी स्विगीपेक्षा झोमॅटोला (बाय कॉल ५५० रुपये) प्राधान्य दिलं आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner