Zomato Pure Veg Mode : फूड डिलिव्हरी सर्व्हिस क्षेत्रातील आघाडीची कंपनी झोमॅटोनं देशातील शाकाहारी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं 'प्युअर व्हेज मोड' आणि 'प्युअर व्हेज फ्लीट' या दोन सेवा सुरू केल्या आहेत. टप्प्याटप्प्यानं संपूर्ण देशभरात या सेवा दिल्या जाणार आहेत.
झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी आज ही घोषणा केली. गोयल यांनी 'एक्स'वर झोमॅटोच्या नवीन फीचरबद्दल माहिती दिली. शाकाहारी ग्राहकांकडून नोंदवलेल्या अभिप्रायाची दखल घेऊन हे फीचर लाँच करण्यात आल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
'प्युअर व्हेज मोड'मध्ये केवळ शुद्ध शाकाहारी जेवण देणाऱ्या रेस्टॉरंट्सची यादी असेल. इतकंच नव्हे, या मोडद्वारे दिलेल्या ऑर्डर्स झोमॅटोच्या 'प्युअर व्हेज फ्लीट'द्वारे ग्रीन डिलिव्हरी बॉक्स घेऊन वितरित केल्या जातील. याचाच अर्थ, प्युअर व्हेज मोडमध्ये झोमॅटो बॉयचा ड्रेसकोडही बदललेला असेल. तो निसर्गाशी नातं सांगणारा हिरवा रंग असेल.
दीपेंदर गोयल यांनी नव्या उपक्रमाची माहिती देताना प्युअर व्हेज फ्लीटमधील डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हचा फोटोही शेअर केला आहे.
झोमॅटोच्या नुकत्याच लाँच झालेल्या प्युअर व्हेज फ्लीटच्या डिलिव्हरी बॉयनी परिधान केलेला ड्रेस परिधान करून गोयल यांनी स्वत:सह झोमॅटोफूड डिलिव्हरीचे सीईओ राकेश रंजन यांचाही एक फोटो शेअर केला आहे.
'एक्स'वर तासाभरापूर्वी हे ट्विट शेअर करण्यात आलं आहे. अवघ्या काही वेळात या ट्वीटला जवळपास ५००० व्ह्यूज मिळाले असून ते वाढतच आहेत. अनेकांनी पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्येही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
झोमॅटोच्या या नव्या प्रयत्नांना ग्राहकांनी आणि नेटकऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दीपेंदर गोयल यांच्या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
'धन्यवाद, एकदा मी व्हेजची ऑर्डर केली होती, पण मला चिकन मिळालं होतं, असं एका व्यक्तीनं म्हटलं आहे.
आणखी एक युजर म्हणतो, 'शाकाहारी लोकांना फक्त शाकाहारी रेस्टॉरंट्समध्ये खाणं आणि तशाच रेस्टॉरंट्समधून ऑर्डर करणं सर्वात सोयीस्कर वाटतं. खाद्यपदार्थ कसे हाताळले जातात याची त्यांना सर्वात मोठी चिंता असते. वेगळी भांडी आणि वेगळं तेल वापरलं जातं की नाही? याचीही त्यांना काळजी असते.
हे स्वतंत्र अॅप असेल की झोमॅटोमध्येच फीचर असेल?; असा प्रश्न तिसऱ्या ग्राहकानं केला आहे.
चौथ्या व्यक्तीनं असं म्हटलं आहे की, 'मी एका थ्री स्टार रिसॉर्टमध्ये काम केलं आहे आणि मला माहीत आहे की स्वयंपाक कसा केला जातो. मांस शिजवलेल्या तेलाचा वापर शाकाहारी जेवणात सर्रास केला जातो. अनेकांना हे किळसवाणं वाटेल,' असंही त्यानं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या