Zomato news in marathi : झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल सतत काहीतरी नाविन्यपूर्ण कल्पना लढवत असतात. त्यामुळं ते नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ते चर्चेत आले आहेत. त्यासाठी कारण ठरलं आहे त्यांनी दिलेली नोकरीची एक भन्नाट ऑफर.
दीपिंदर गोयल यांनी बुधवारी काही विचित्र अटींसह थेट ‘चीफ ऑफ स्टाफ’ पदासाठी नोकरीची ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरनुसार, या नोकरीत पहिल्या वर्षी पगार मिळणार नाही, उलट उमेदवाराला कंपनीला २० लाख रुपये द्यावे लागतील. या अनोख्या जॉब ऑफरच्या माध्यमातून विविध प्रकारचं टॅलेंट आकर्षित करण्याचा त्यांचा मानस आहे. जे पैशाचा विचार न करता केवळ शिकण्यासाठी आणि काहीतरी योगदान देण्यास उत्सुक आहेत, ते या ऑफरचा नक्की लाभ घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
गोयल यांच्या या ऑफरवर सोशल मीडियात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण याला शिकण्याची उत्तम संधी म्हणत आहेत तर काही याच्या विरोधात आहेत. मात्र, उद्योजकांचा याला पाठिंबा आहे.
उद्योजक अर्णव गुप्ता यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर गोयल यांचे ट्विट रिट्विट करत ही एक चांगली संधी असल्याचं म्हटलं आहे. गुप्ता लिहितात... खरा ऑल्ट एमबीए आला आहे. २० लाख फी... १ वर्षाचा कोर्स...
झोमॅटोच्या सीईओच्या ऑफिसमध्ये १ वर्षाची इंटर्नशिप. झोमॅटोकडून सीओएस म्हणून एक कोटी रुपयांच्या नोकरीची हमी, फक्त १ जागा. इतर मोठ्या कंपन्यांचे संस्थापक/मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या स्टाफ ऑफिससाठी असाच कार्यक्रम तयार करावा, असं गुप्ता यांनी म्हटलं आहे.
आपल्या पुढील ट्विटमध्ये ते लिहितात... मला माहीत आहे की लोक पेड इंटर्नशिपबद्दल मूर्खासारखं काही तरी बोलत आहेत. मात्र त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की इथं १ वर्ष काम करण्याची संधी मिळत आहे. जर तुम्ही मॅनेजमेंट कन्सल्टिंग/स्ट्रॅटेजीमध्ये करिअर करू इच्छित असाल तर त्याची किंमत २० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. टॉप मॅनेजमेंट स्कूलमधून २ वर्षांच्या पदवीपेक्षा १० पट जास्त शिकण्याची ही संधी आहे.
दीपिंदर गोयल यांनी गुरुवारी एक्सवर लिहिले की, 'मी स्वतःसाठी चीफ ऑफ स्टाफ शोधत आहे. या जॉबसाठी काय पात्रता हवी यासाठी दोन पानांचं रिक्वायरमेंट डॉक्युमेंटही त्यांनी पोस्टसोबत जोडलेलं आहे. त्यात आदर्श उमेदवाराकडून असलेल्या अपेक्षांची माहिती आहे. यात या पदासाठी अर्ज कसा करायचा हे सांगण्यात आलं आहे. याशिवाय नोकरी मिळण्याची अट काय आहे? यात दीपिंदर गोयल यांनी उमेदवार हा जमिनीवर पाय ठेवून काम करणारा असावा, असं नमूद केलं आहे. उमेदवाराकडून मिळालेले २० लाख रुपये फीडिंग इंडिया या स्वयंसेवी संस्थेला दान करण्यात येणार आहेत. चीफ ऑफ स्टाफचा पगार ५० लाख रुपये असून कंपनी तेवढीच रक्कम निवड झालेल्या उमेदवाराच्या पसंतीच्या चॅरिटीमध्ये जमा करेल, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे. एक वर्षाचा पगाराचा खर्च वाचवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे हा समज यातून त्यांनी खोडून काढला आहे.