Zomato Name Change : देशातील नव्या पिढीच्या तोंडात रुळलेलं झोमॅटो हे नाव आता इतिहासजमा होणार आहे. देशातील सर्वात मोठी ऑनलाइन फूड आणि किराणा डिलिव्हरी कंपनी असलेल्या झोमॅटो कंपनीचं नाव आता बदललं जाणार आहे.
कंपनीच्या संचालक मंडळानं या नामांतरास मंजुरी दिली आहे. त्यानुसार कंपनीचं नवं नाव ‘इटर्नल’ असं असेल. या नव्या नावाच्या लोगोचं अनावरणही करण्यात आलं आहे. संचालक मंडळाच्या निर्णयानंतर कंपनीचे सीईओ दीपिंदर गोयल यांनीही शेअरहोल्डर्सना उद्देशून सविस्तर पत्र लिहिलं आहे. आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगतानाच त्यांनी शेअरहोल्डर्सच्या पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
झोमॅटो ही अॅक्सिडेंटल कंपनी आहे. गेल्या वर्षी २३ डिसेंबरला आम्ही शेअर बाजारात एन्ट्री केली. बरोब्बर १७ वर्षांपूर्वी याच तारखेला मी फूडबे म्हणून Zomato ला सुरुवात केली होती. झोमॅटोनं प्रचंड संपत्ती मिळवून दिली. माझ्यासह कंपनीचे कर्मचारी संस्थात्मक व किरकोळ गुंतवणूकदार यांचाही फायदा झाला. अर्थात हे सगळं मी पैसे कमावण्याचे उद्देशानं केलं नव्हतं. मला काहीतरी वेगळं करता यावं हा हेतू होता. एके दिवशी सहज म्हणून मी बाजारात गेलो. मेन्यू कार्ड गोळा केले आणि एका वेबसाइटवर अपलोड केले. याचं उद्योगात रूपांतर होईल असं मला तेव्हा वाटलं नाही. मी पैशाचा विचार करत नव्हतो. त्यामागे मदतीची भावना होती, असं गोयल यांनी पत्रात म्हटलं आहे.
‘जेव्हा आम्ही ब्लिंकिट विकत घेतले तेव्हा कंपनी आणि ब्रँड/ॲप यांच्यात फरक करण्यासाठी आम्ही अंतर्गत झोमॅटोऐवजी इटर्नल वापरण्यास सुरुवात केली. भविष्यात कधी तरी झोमॅटोच्या पलीकडं काही करायचं झाल्यास कंपनीचं नाव बदलून 'इटर्नल’ करू असाही विचारही तेव्हा केला होता. आता ब्लिंकिटमुळं तो क्षण आला आहे, असं गोयल यांनी म्हटलं आहे.
कंपनीचं नाव बदलण्यात आलं असलं तरी Zomato ॲपचं नाव बदललं जाणार नाही केवळ स्टॉक टिकर Zomato वरून Eternal मध्ये बदललं जाईल. इटर्नलमध्ये झोमॅटो, ब्लिंकिट, डिस्ट्रिक्ट आणि हायपरप्युअर या चार प्रमुख व्यवसायांचा समावेश असेल. 'हे एक शक्तिशाली नाव आहे. मनापासून सांगायचं झालं तर हे माझ्यासाठी आव्हान आहे. हे फक्त नामांतर नाही तर ते एक मिशन आहे, असं गोयल म्हणाले.
झोमॅटोचा शेअर आज किंचित घसरून २२९.९० रुपयांवर आला आहे. मागच्या वर्षभरात या शेअरमध्ये ६४ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर पाच वर्षांत हा शेअर ८२ टक्क्यांनी वाढला आहे.
संबंधित बातम्या