Zee Entertainment Fund Diversion news : सोनी इंडियासोबत विलिनीकरणाची प्रक्रिया निष्फळ ठरल्यानंतर झी एंटरटेन्मेंट समूहासमोर नवं संकट उभं राहिलं आहे. झी एंटरटेन्मेंट एन्टरप्रायझेसच्या बँक खात्यांमध्ये २००० कोटी रुपयांची आर्थिक घोटाळा आढळून आला आहे. शेअर बाजार नियामक सेबीनं हा खुलासा केला आहे.
ब्लूमबर्गनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. 'झी'च्या संस्थापकांच्या चौकशीतून सेबीला ही माहिती मिळाली आहे. त्यानुसार सुमारे २,००० कोटी रुपये कंपनीच्या खात्यातून अन्यत्र वळवण्यात आले आहेत. सेबीला अपेक्षित रकमेपेक्षा ही रक्कम दहापट अधिक आहे.
बँक खात्यातून वळवण्यात आलेल्या रकमेचा आकडा अद्याप अंतिम नाही. हा आकडा कमी-जास्त असू शकतो. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर त्यात बदल होण्याची शक्यता आहे. सेबीनं झीचे संस्थापक सुभाष चंद्रा, त्यांचे पुत्र पुनीत गोएंका आणि संचालक मंडळाच्या काही सदस्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना तपासासाठी समन्स बजावलं आहे.
या संदर्भात ब्लूमबर्ग आणि रॉयटर्सनं ई-मेलद्वारे पाठवलेल्या प्रश्नांना सेबीनं प्रतिसाद दिलेला नाही. झीच्या प्रवक्त्यांनी आर्थिक अनियमिततेचा दावा फेटाळून लावला आहे. कंपनी सेबीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करत आहे, असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सोनीबरोबरची १० अब्ज डॉलरची विलीनीकरण योजना निष्फळ ठरल्यानंतर गुंतवणूकदारांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न करणारे 'झी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत गोएंका यांच्यासमोर या घडामोडींमुळं नवी आव्हानं उभी राहिली आहेत. झी-सोनीच्या विलिनीकरणानंतर नव्या कंपनीचं नेतृत्व कोण करणार यावरून दोन वर्षे चाललेली विलिनीकरणाची प्रक्रिया जानेवारी महिन्यात थांबली होती.
हे विलिनीकरण प्रत्यक्षात आले असते तर सोनीला भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये शिरकाव करता आला असता तर, 'झी'ची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता होती. मात्र हे सगळंच आता बारगळलं आहे.
'झी'च्या संदर्भात आलेल्या घोटाळ्याच्या बातमीमुळं गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम कंपनीच्या शेअरवर झाला आहे. आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी बुधवारी झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसच्या शेअरला लोअर सर्किट लागलं आहे.
झीचा शेअर आज १० पेक्षा जास्त टक्क्यांनी घसरला असून सध्या १७२.६० रुपयांवर ट्रेड करत आहे. जानेवारी महिन्यात सोनीसोबतचा करार रद्द झाल्यानंतर सुद्धा झी एंटरटेनमेंटचे शेअर्स घसरले होते. २३ जानेवारी २०२४ रोजी शेअरची किंमत १५२.५० रुपयांवर गेली होती.