झी एन्टरटेनमेंटच्या नफ्यात ७० टक्के वाढ; कंपनीच्या शेअरची जोरदार उसळी, पण पुढं काय?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  झी एन्टरटेनमेंटच्या नफ्यात ७० टक्के वाढ; कंपनीच्या शेअरची जोरदार उसळी, पण पुढं काय?

झी एन्टरटेनमेंटच्या नफ्यात ७० टक्के वाढ; कंपनीच्या शेअरची जोरदार उसळी, पण पुढं काय?

Oct 18, 2024 05:18 PM IST

zee ent share price : मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची कंपनी झी एन्टरटेनमेंटच्या तिमाही नफ्यात भरघोस वाढ झाली असून त्याचं प्रतिबिंब शेअर बाजारात उमटलं आहे.

झी एन्टरटेनमेंटच्या नफ्यात ७० टक्के वाढ; कंपनीच्या शेअरची जोरदार उसळी
झी एन्टरटेनमेंटच्या नफ्यात ७० टक्के वाढ; कंपनीच्या शेअरची जोरदार उसळी

Zeel Share Price : चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल शेअर बाजारात उलथापालथ घडवणारे ठरले आहेत. तिमाही निकालानंतर अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. झी एन्टरटेनमेंट एन्टरप्रायजेस लिमिटेडचा शेअरही यास अपवाद नाही. या कंपनीच्या शेअरमध्ये आज ३.७७ टक्क्यांची वाढ होऊन हा शेअर १३०.५० रुपयांवर पोहोचला.

चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत झी एन्टरटेनमेंट एन्टरप्रायजेस लिमिटेडचा एकत्रित निव्वळ नफा ७० टक्क्यांनी वाढून २०९ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १२३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. यंदाच्या निकालाचा सकारात्मक परिणाम शेअरच्या किंमतींवर दिसून आला आहे.

एकूण उत्पन्नात १९ टक्क्यांची घसरण

जुलै ते सप्टेंबर २०२४ या तिमाहीत झी एन्टरटेनमेंट एन्टरप्रायजेस लिमिटेडचं एकूण उत्पन्न १९ टक्क्यांनी घटून २०३४ कोटी रुपये झालं आहे. त्रैमासिक आधारावर कंपनीच्या करोत्तर नफ्यात ७७ टक्के वाढ झाली आहे. जून २०२४ तिमाहीत कंपनीला ११८ कोटी रुपयांचा नफा झाला होता. सप्टेंबर २०२४ तिमाहीत कंपनीचा एबिटडा ३२१ कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर तो ४ टक्क्यांनी कमी आहे. तर, मार्जिन सुधारून १६ टक्क्यांवर आले आहे. झी एन्टरटेनमेंट एन्टरप्रायझेसचं मार्केट कॅप १२७१७ कोटी रुपयांच्या पुढं गेलं आहे. कंपनीनं पुनीत गोएंका यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पाच वर्षांसाठी फेरनियुक्ती केली आहे.

कशी आहे शेअरची वाटचाल?

मागच्या वर्षभरात कंपनीचे शेअर एनएसईवर ४९.१७ टक्क्यांनी घसरले आहेत तर, चालू कॅलेंडर वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास ५४ टक्क्यांची घसरण झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२४ रोजी कंपनीचा शेअर २८५ रुपयांवर होता. आज, १८ ऑक्टोबर २०२४ रोजी तोच शेअर १३०.५० रुपयांवर बंद झाला आहे.

गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम कायम

झी एन्टरटेनमेंटच्या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी २९९.७० रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १२४.९२ रुपये आहे. मागच्या वर्षभरापासून या शेअरनं नकारात्मक परतावा दिला आहे. त्यामुळं आजची वाढ दिलासादायक असली तरी हाच कल यापुढंही कायम राहील का याविषयी गुंतवणूकदारांना उत्सुकता आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner