Zee Entertainment Share Price : झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचा शेअर आज तब्बल ११.५० टक्क्यांनी वाढून थेट दीडशे पार गेला. सोनी इंडिया सोबत सुरू असलेल्या विलिनीकरणाच्या वादावर सामोपचारानं तोडगा निघाल्याचा हा परिणाम मानला जात आहे.
झी आणि सोनी इंडियाचं प्रस्तावित विलिनीकरण रद्द झाल्यामुळं दोन्ही कंपन्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. हा वाद कोणत्याही आर्थिक देवाण-घेवाणीशिवाय मिटविण्यासंदर्भात दोन्ही कंपन्यांनी करार केला आहे. या कराराचा भाग म्हणून सिंगापूर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर (SIAC) आणि नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) मध्ये करण्यात आलेले सर्व दावे मागे घेण्यात येणार आहेत.
सोनी इंडियासोबत समझोता जाहीर केल्यानंतर बीएसईवर झी एंटरटेनमेंटचा शेअर १२ टक्क्यांनी वधारून १५०.५ रुपयांवर पोहोचला. सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (SPNI) म्हणून कार्यरत असलेल्या झी एंटरटेनमेंट, कल्व्हर मॅक्स एंटरटेनमेंट आणि बांगला एंटरटेनमेंट (BEPL) यांनी सर्वसमावेशक नॉन-कॅश सेटलमेंटवर सहमती दर्शविली. त्याचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले. झी एन्टरटेनमेंटचा शेअर दिवसअखेर ११.६१ टक्क्यांनी वाढून १५०.९० रुपयांवर गेला.
विलिनीकरण करारातील काही आर्थिक अटींची पूर्तता करण्यात झी अपयशी ठरल्यानं या दोन्ही कंपन्यांनी जानेवारीत विलीनीकरण रद्द केलं. यावर्षी जानेवारीमध्ये सोनीनं झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडसोबत प्रस्तावित १० अब्ज डॉलर्सच्या विलीनीकरणातून माघार घेतली होती. विलिनीकरणाची घोषणा झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांहून अधिक काळानंतर वाद झाला आणि विलिनीकरण रद्द झालं. त्यानंतर दोन्ही पक्ष न्यायालयात गेले. झीनं एनसीएलटीकडे केलेला अर्ज एप्रिलमध्ये मागे घेतला होता. त्यामुळं तोडग्याची आशा निर्माण झाली होती.
सोनी इंडियासोबत झालेल्या तडजोडीची माहिती झी एंटरटेनमेंटनं स्टॉक एक्स्चेंजला दिली आहे. त्यानुसार, हे नॉन-कॅश सेटलमेंट आहे. कोणत्याही पक्षाची एकमेकांवर कोणतीही जबाबदारी किंवा देणं राहणार नाही. भविष्यातील वाढीच्या संधींचा स्वतंत्रपणे नव्या दमानं पाठपुरावा करण्यासाठी आणि विकसित होत असलेल्या मीडिया आणि करमणुकीच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी परस्पर सामंजस्यातून हा तोडगा निघाला आहे, असं कंपनीनं म्हटलं आहे.