Paytm Clarification on RBI Restrictions : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई करत येत्या २९ फेब्रुवारीनंतर कोणत्याही खात्यात नव्या ठेवी स्वीकारू नयेत, असे आदेश दिले आहेत. त्यामुळं ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असतानाच कंपनीनं महत्त्वाचा खुलासा केला आहे. पेटीएम ॲप २९ फेब्रुवारी नंतर देखील कार्यरत राहील, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी स्वत: ‘एक्स’वर पोस्ट करून ग्राहकांना दिलासा दिला आहे. 'तुमचे आवडते पेटीएम ॲप कार्यरत आहे आणि २९ फेब्रुवारी नंतर देखील कार्यरत राहील. तुमच्या अविरत पाठिंब्यासाठी मी आणि पेटीएमची टीम तुमची आभारी आहे, असं विजय शेखर शर्मा यांनी म्हटलं आहे.
'प्रत्येक अडचणीवर उपाय असतो. आम्ही सर्व प्रकारच्या नियमांचं पालन करून देशातील ग्राहकांची सेवा करण्यास कटिबद्ध आहोत. आर्थिक सेवांमधील नाविन्यता व पेमेंट व्यवस्थेत भारत यापुढंही प्रगती करत राहील आणि पेटीएम त्यात सर्वात मोठं योगदान देईल, असं विजय वर्मा यांनी म्हटलं आहे.
पेटीएम ग्राहकांना चिंता करण्याची गरज नाही. अॅप सुरू आहे आणि सुरू राहील असं आरबीआयनंही स्पष्ट केल्याचं पेटीएमनं स्पष्ट केलं आहे.
१. पेटीएमद्वारे देण्यात येणाऱ्या बहुतांश सेवा विविध बँकांशी (सहयोगी बँकासह) सहकार्यानं होत असल्यामुळे पेटीएम आणि त्यांच्या सेवा २९ फेब्रुवारीनंतर देखील कार्यरत राहतील.
२. पेटीएम ग्राहकांची बचत खाती, वॉलेट्स, फास्टटॅग्स व एनसीएमसी खात्यांमधील जमा रकमेवर काहीच परिणाम होणार नाही आणि ते विद्यमान शिल्लक रकमेचा वापर करू शकतात.
३. पेटीएम पेमेंट्स बँकेबाबत आरबीआयनं दिलेल्या निर्देशांचा पेटीएम मनी लिमिटेडच्या (पीएमएल) कार्यसंचालनांवर किंवा इक्विटी, म्युच्युअल फंड किंवा एनपीएसमधील ग्राहकांच्या गुंतवणूकांवर कोणताच परिणाम होणार नाही.
४. कर्ज वितरण, विमा वितरण व पेटीएमच्या इतर आर्थिक सेवांचा पेटीएम पेमेंट बँकेशी संबंध नाही आणि त्या सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
५. पेटीएम क्यूआर, पेटीएम साऊंडबॉक्स, पेटीएम कार्ड मशिन या सेवा देखील नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील, या सेवांचा लाभ नव्या ग्राहकांनाही घेता येईल.
६. पेटीएम ॲपवरील मोबाइल रिचार्जेस्, सबस्क्रिप्शन्स आणि इतर रिकरिंग पेमेंट्स सुलभपणे कार्यरत राहतील.