WhatsApp Scam: तुम्हाला कोणत्याही अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला असेल आणि समोरचा व्यक्ती दूरसंचार विभागातील सरकारी अधिकारी असल्याचा दावा करत असेल तर वेळीच सावध व्हा. अन्यथा तुमचा वैयक्तिक डेटा चोरी होण्याची शक्यता आहे. सायबर गुन्हेगारांच्या वाढत्या घटना पाहता सरकारने नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना दिली आहे.सायबर गुन्हेगार दूरसंचार अधिकाऱ्याच्या नावाखाली नागरिकांना कॉल करीत आहेत. तसेच त्यांचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला जाईल, अशी भिती दाखवून नागरिकांकडून त्यांचा वैयक्तिक मिळवत आहेत.
भारताचा मोबाईल कोड +९१ आहे. याशिवाय, दुसऱ्या कोडपासून सुरु होणारे मोबाईल क्रमांक परदेशी असतात. +९२ पासून सुरू होणारे मोबाईल क्रमांक पाकिस्तानचे आहेत. यामुळे नागरिकांनी +९१ व्यतिरिक्त दुसऱ्या कोडने सुरुवात होणाऱ्या मोबाईल क्रमांकावरून कॉल आल्यास सावधानी बाळगावी. तसेच अनोळखी व्यक्तींचे व्हिडिओ कॉल स्वीकारणे टाळले पाहिजे. व्हॉट्सअॅपवर फोन करणाऱ्याची प्रथम ओळख पडताळून पाहणे अत्यंत गरजेचे आहे.
सरकारने जारी केलेल्या अॅडव्हायजरीनुसार, “सायबर गुन्हेगार अशा कॉल्सच्या माध्यमातून नागरिकांचा वैयक्तिक टेडा चोरी करण्याचा प्रयत्न करतात. दूरसंचार विभागाकडून अशा कोणत्याही प्रकारचा कॉल केला जात नाही. यामुळे दूरसंचार विभागातील अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीकडून सावध राहा. असा कॉल प्राप्त झाल्यास त्यांना कोणतीही खाजगी माहिती सांगू नये. नागरिकांना अशा प्रकारचा कोणताही कॉल आल्यास त्यांनी www.sancharsaathi.gov.in या सरकारी वेबसाईटवर माहिती द्यावी. ज्यामुळे सायबर क्राईम, आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी सरकारला मदत होते."
याशिवाय, नागरिक संचार साथी पोर्टलच्या 'नो योर मोबाइल कनेक्शन्स' सुविधेवर आपल्या नावाचे मोबाइल कनेक्शन तपासू शकतात आणि त्यांनी न घेतलेल्या किंवा आवश्यक नसलेल्या कोणत्याही मोबाइल कनेक्शनची तक्रार करू शकतात. सायबर क्राईम किंवा आर्थिक फसवणुकीला बळी पडल्यास सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक १९३० किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार करावी, असा सल्लाही दूरसंचार विभागाने दिला आहे.