Share market news : देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमत्त आज, १५ ऑगस्टला शेअर बाजार बंद आहे. त्यामुळं गुंतवणूकदार शुक्रवारचा विचार करत आहेत. शुक्रवारच्या रणनीतीचा विचार करणाऱ्यांसाठी आम्ही ५ मल्टीबॅगर मिडकॅप शेअर्सची माहिती देत आहोत. हे पाच शेअर या वर्षात सर्वाधिक वाढलेले आहेत.
यंदाच्या वर्षातील टॉप गेनरच्या या यादीत ऑइल इंडिया, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IRFC), ट्रेंट लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) आणि ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेड यांचा समावेश आहे. हे शेअर मल्टीबॅगर ठरले आहेत.
लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, गुंतवणूकदारांच्या दृढ विश्वासामुळं एस अँड पी बीएसई मिडकॅप निर्देशांक गेल्या वर्षभरात ५३ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. तरीही अनेक शेअर्सनी मिडकॅप निर्देशांकातील तेजीला मागे टाकलं आहे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये सुमारे २५१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
२०० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये ट्रेंट लिमिटेडचा समावेश आहे. ट्रेंटच्या किंमती गेल्या वर्षभरात सुमारे २३३ टक्के वाढल्या आहेत. ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेडच्या शेअरची किंमत जवळपास १६६ टक्क्यांनी वाढली असून या शेअरनं टॉप ५ मिडकॅप गेनर्सच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
तेल उत्पादनात वाढ, नुमालीगड रिफायनरीचा विस्तार आणि देशांतर्गत उत्पादित गॅसच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळं तेलाच्या वाढत्या उत्पादनाचा फायदा होण्याची शक्यता आहे. यामुळं ऑईल इंडियाच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली. गेल्या वर्षभरात ऑइल इंडिया लिमिटेडच्या शेअरची किंमत २५७ टक्क्यांनी वाढली आहे. यामुळं गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळाला.
किरकोळ विक्री क्षेत्रातील इतर रिटेलर्सच्या निराशाजनक कामगिरीनंतरही ट्रेंटच्या पहिल्या तिमाहीतील मजबूत कामगिरीबद्दल विश्लेषक सकारात्मक आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या विश्लेषकांच्या मतानुसार, उत्तम उत्पादकता, आक्रमक स्टोअर जोडणी, मार्जिनल टेलविंड आणि कच्च्या मालाचा खर्च कमी करून ऑपरेटिंग लिव्हरेजच्या आधारे आर्थिक वर्ष २०२४-२६ च्या कालावधीत महसूल आणि निव्वळ नफा ४१ टक्के आणि ५२ टक्के चक्रवाढ वार्षिक विकास दर (CAGR) राहण्याचा अंदाज आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) आणि ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेडच्या शेअर्सच्या किमतीतही अभूतपूर्व वाढ झाली आहे. भेलच्या शेअरच्या किंमतीत १८५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढत्या आर्थिक घडामोडी, देशातील विजेची जोरदार मागणी, सरकारचे भांडवली खर्चाचे उपक्रम आणि रेल्वेवरील खर्च यामुळं भेलच्या शेअरमध्ये तेजी आली.