Yes Bank Share Price : कर्ज घोटाळ्यामुळं मागच्या तीन वर्षांपासून गाळात गेलेला येस बँकेचा शेअर काही दिवसांपासून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. आज शेअरचा भाव एनएसईवर इंट्राडे व्यवहारात ६ टक्क्यांनी वधारून २६.२५ रुपयांवर पोहोचला. शेअरच्या भावाचा ५२ आठवड्यांचा हा उच्चांक आहे.
येस बँकेचा शेअर आज २४.७५ रुपयांवर खुला झाला आणि काही वेळातच ६.१ टक्क्यांनी वाढून २६.२५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. दुपारी साडेबाराच्या सुमारास एनएसईवर येस बँकेचा शेअर ४.४४ टक्क्यांनी वधारून २५.८५ रुपयांवर पोहोचला.
रिझर्व्ह बँकेच्या सध्याच्या निर्देशांनुसार नागरिकांना फाटलेल्या नोटा बदलण्याची सुविधा उपलब्ध करून न दिल्याबद्दल येस बँकेला १०,००० आणि ५,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे, अशी माहिती बँकेनं सोमवारी दिली होती. असं असतानाही येस बँकेच्या समभागांच्या किंमतीत आज वाढ झाली.
येस बँकेच्या शेअरच्या किमतीत मागील कॅलेंडर वर्षाच्या नोव्हेंबरपासून जोरदार वाढ होत आहे. येस बँकेच्या शेअरमध्ये नोव्हेंबरमध्ये २१ टक्के आणि डिसेंबरमध्ये ११ टक्के वाढ झाली आहे. चालू महिन्यात आतापर्यंत या शेअरमध्ये २१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
येस बँकेच्या भवितव्याबाबत बाजार विश्लेषक अत्यंत सकारात्मक आहेत. बँकेचे डिसेंबर तिमाहीचे निकाल चांगले येतील, अशी आशा काही बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बँकेचे डिसेंबरच्या तिमाहीचे निकाल शनिवार, २७ जानेवारी रोजी जाहीर होणार आहेत.
ब्रोकरेज फर्म एमके ग्लोबलनं येस बँकेचा तिसऱ्या तिमाहीतील निव्वळ नफा वाढून ४१५.१ कोटी रुपये होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मनं दिलेल्या माहितीनुसार, येस बँकेचं निव्वळ व्याज उत्पन्न (NII) म्हणजे मिळविलेले व्याज आणि दिलेले व्याज यातील फरक वार्षिक आधारावर ४.५ टक्के आणि तिमाही आधारावर ५.३ टक्क्यांनी वाढून २,०५९ कोटी रुपये होण्याची शक्यता आहे.
एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अहवालाच्या आधारे सांगायचं झाल्यास, चालू आर्थिक वर्षात भारतातील इतर बँकांशी तुलना करता डिसेंबर तिमाहीत येस बँकेच्या बाजार भांडवलात सर्वाधिक वाढ केली आहे. डिसेंबर तिमाहीत बँकेचं बाजार भांडवल २४.४ टक्क्यांनी वाढून ६१,६९४ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. यामुळं येस बँकेनं मार्केट कॅपनुसार टॉप २० भारतीय बँकांच्या यादीत दोन बँकांना मागे टाकत १४ वं स्थान पटकावलं आहे.
पर्यावरणस्नेही, सामाजिक आणि प्रशासन (ESG) दर्जाच्या बाबतीत एस अँड पी ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट (सीएसए) २०२३ मध्ये सर्वाधिक स्कोअर मिळवल्याचा दावा येस बँकेनं केला आहे. बँकेनं २०२३ च्या एस अँड पी ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंटमध्ये ७३ (१०० पैकी) गुण मिळवले आहेत. मागील वर्षीच्या गुणांपेक्षा यंदा ५ गुण अधिक मिळाले आहेत.
येस बँकेच्या शेअरमधील सध्याची तेजी नजिकच्या काळात अशीच राहील असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
प्रभुदास लिलाधरच्या टेक्निकल अॅनालिस्ट विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांच्या मतानुसार येस बँकेचा शेअर ३४ ते ४० रुपयांचं लक्ष्य गाठू शकतो.
आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्सचे इक्विटी रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक जिगर एस. पटेल यांच्या मतानुसार, हा शेअर ३१ रुपयांपर्यंत जाऊ शकतो. गुंतवणूकदार २१ रुपयांचा स्टॉप लॉस लावून गुंतवणूक करू शकतात.
(डिस्क्लेमर : वरील लेखात केवळ शेअरच्या कामगिरीची माहिती आहे. तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक आहेत. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)