Yes Bank Share Price : येस बँकेचे समभाग शुक्रवारी व्यवहारादरम्यान चर्चेत होते. कंपनीचा शेअर आज इंट्राडे ट्रेडिंगमध्ये ३ टक्क्यांनी वधारला आणि २०.१८ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या या वाढीमागे सकारात्मक तिमाही निकाल आहेत.
येस बँकेनं चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. हे निकाल उत्साहवर्धक असून त्याचं सकारात्मक प्रतिबिंब बँकेच्या शेअरच्या किंमतीवर पडलं आहे.
शेअर बाजार विश्लेषकांच्या मते, येस बँकेनं गुरुवारी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ तिमाहीसाठी सकारात्मक व्यवसाय दृष्टीकोन नोंदविला असल्यानं कंपनीच्या शेअर्समध्ये आज वाढ होत आहे. यामुळं येस बँकेच्या शेअर्समध्ये खरेदीचा रस वाढला आहे.
येस बँकेच्या समभागांबाबत बोलताना चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागरिया म्हणाले, 'येस बँकेचा शेअर तांत्रिक चार्टवर सकारात्मक दिसत असून लवकरच तो २२ ते २४ रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, खरेदी करताना १९ रुपयांवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
येस बँकेने चालू आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील बिझनेसची माहिती स्टॉक एक्स्चेंजला दिली आहे. तिसऱ्या तिमाहीत बँकेच्या ठेवी १४.६ टक्क्यांनी वाढून २.७७ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ठेवींचा आकडा २.४१ लाख कोटी रुपये होता. येस बँकेची कर्जे आणि अॅडव्हान्स १२.६ टक्क्यांनी वाढून २.४५ लाख कोटी रुपये झाले आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत हा आकडा २.१७ लाख कोटी रुपये होता. तिमाही विकासदर ४.२ टक्क्यांनी वाढून २.४५ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या तिमाहीत सीएएसए (CASA) २७.६ टक्क्यांनी वाढून ९१,५७५ कोटी रुपये झाला आहे.
संबंधित बातम्या